गुजरातमध्ये जमावाचा पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला, 47 जखमी

गुजरातच्या बनासकांठा जिह्यात शनिवारी धक्कादायक घटना घडली. सुमारे 500 हून अधिक लोकांच्या जमावाने पोलिसांसह महसूल व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केला. त्यात पोलिसांसह 47 कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अंबाजी तीर्थक्षेत्रापासून 14 किलोमीटरवर असलेल्या पडलिया गावात ही घटना घडली. जिल्हाधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास वन व महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी वन विभागाच्या सर्व्हे नंबर 9 वर रोपवाटिकेचे व वृक्षारोपणाचे काम करत होते. या जमिनीबाबत आधीपासूनच वाद असल्याने पोलिसांचाही मोठा बंदोबस्त यावेळी होता. हे काम सुरू असतानाच अचानक शेकडोंचा जमाव चालून आला.

जमीन जाण्याची गावकऱ्यांना भीती

या हल्ल्याचे नेमके कारण समजू शकलेले नाही, मात्र येथील जागेवरून वाद होता. सरकारकडून आपली जमीन हिसकावून घेतली जाण्याची भीती स्थानिकांना आहे. त्यातूनच हा प्रकार घडल्याचे बोलले जाते. याप्रकरणी एकूण 527 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे.

बचावासाठी वेळ मिळाला नाही

काही कळण्याच्या आत या जमावाने पोलीस व इतर कर्मचाऱयांना चारी बाजूंनी घेरले आणि तुफान हल्ला चढवला. दगड-विटांचा मारा केला. धनुष्यबाण चालवले आणि गोफणीतूनही दगड भिरकावले. बेसावध पोलीस व कर्मचाऱयांनाही स्वतःचा बचाव करण्यासही वेळ मिळाला नाही. दगडांच्या आणि बाणांच्या माऱयामुळे पोलीस अक्षरशः रक्तबंबाळ झाले. संतप्त जमावाने अधिकाऱयांच्या गाडय़ा जाळल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. तसेच अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या. जखमी झालेल्या 36 अधिकाऱयांना अंबाजी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, तर 11 जणांना पालनपूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.