पिंपरी- घरासमोर गर्दी करू नका म्हटल्याने चौघांना जीवे मारण्याची धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना विषाणूची साथ सुरू आहे, तुम्ही घरासमोर गर्दी करू नका, असे सांगणाऱ्या दोघांना तीन जणांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांना सोडविण्यासाठी आलेल्या दोन नातेवाईक महिलांनाही धक्काबुक्की करत त्यांचा विनयभंग केला. तसेच घरावर दगड मारून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना मावळातील इंदोरी येथे घडली. याप्रकरणी तळेगाव – एमआयडीसी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

आयुब उस्मान मुलानी (वय 43) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. झाकीर उस्मान मुलानी (वय 40), तन्वीर खान (वय 20, सर्व रा. इंदोरी, ता. मावळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 21 वर्षीय महिलेने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी आणि फिर्यादी यांचे समोरासमोर घर आहे. आरोपींनी त्यांच्या घरासमोर गर्दी केली होती. त्यावेळी फिर्यादी महिलेच्या दिराने आरोपींना ‘घरासमोर गर्दी करू नका, कोरोनाची साथ सुरू आहे’, असे सांगितले.

त्यामुळे चिडलेल्या आरोपींनी फिर्यादी महिलेचे पती, दीर यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांना सोडविण्यासाठी आलेल्या फिर्यादी महिलेच्या जावेला धक्काबुक्की करत विनयभंग केला. तसेच घरावर दगड मारून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.