
सामना प्रतिनिधी । जालना
जालना शहरात बसस्थानकासमोर असलेल्या लोहार गल्लीमध्ये रोहित उर्फ सोन्या नारायण जाधव (17) याचा जमावाने खून केल्याची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांनी खून प्रकरणातील 7 आरोपींना अटक केली आहे.
जालना शहरातील लोहार मोहल्ल्यात राहणारा रोहित जाधव व त्याच्या कुटुंबियांचा गल्लीतील इतर रहिवाश्यांसोबत वाद झाला होता. या वादाचे पर्यावसन खूनात झाले. रोहित जाधवची आई संगीता नारायण जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये 20 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी 8 पुरुष आणि 2 महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच इतर आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी, या मागणीसाठी जाधव यांच्या नातेवाईकांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात गर्दी केली होती.
रोहित जाधव आणि कुटुंबाचा लोहार मोहल्ल्यातील रहिवाशांमध्ये 6 जूनला वाद झाला होता. या वादानंतर इथे राहणाऱ्या तान्ह्या जाधव, सोन्या उर्फ रोहित जाधव आणि भुट्ट्या उर्फ आकाश जाधव या 3 भावांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्या कुटुंबाने मोहल्ल्यातून पलायन केले होते. त्यानंतर येथील जमावाने जाधव परिवाराचे घर पाडून तिथे नासधूस केली होती. रविवारी 9 जूनला रात्री साडेसात वाजता सोन्या उर्फ रोहित जाधव हा कुंडलिका नदीतून आपले पाडलेले घर पाहण्यासाठी येत असताना जमावाने नदीपात्रात सोन्याला गाठून बेदम मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सोन्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सोन्याची आई संगीता नारायण जाधव यांनी सोमवारी बाजार पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली. या तक्रारीमध्ये सोन्याला जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी लोखंडी पाईप, लाठ्या- काठ्यांनी मारहाण करून त्याचा नदीपात्रातील मुरशादाबाद दग्र्याजवळ खून करण्यात आला.
दरम्यान पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रोहित उर्फ सोन्या जाधव हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या खुन प्रकरणात शेख युनूस, शेख रसुल, शेख महेबुब, शेख सलीम, शेख रियाज, सुलतानबी जलालोद्दीन, रुखसान बी शेख या सात जणांसह दोन अल्पवयीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.




























































