मोबाईल हॅक करून व्यापाऱ्याला 50 लाखांचा गंडा

568

ऑनलाईन व्यवहार करताना सातत्याने पासवर्ड बदलणे गरजेचे आहे. अन्यथा सायबर चोरट्यांकडून तुमचा मोबाईल हॅक करून लिंक असलेल्या बँकखात्यातून लाखोंचा गंडा घातला जाऊ शकतो. असाच एक अनुभव सदाशिव पेठेत फायनान्स कंपनी मालकाला तब्बल 50 लाखांना पडला आहे.

सायबर चोरट्यांनी फायनान्स व्यवसायिकाच्या मोबाईल नेटवर्कमध्ये बिघाड करीत (मोबाईल हॅक) बनावट कागदपत्रांद्वारे त्याचक्रमांकाचे सीमकार्ड मिळविले. त्यानंतर बँकखात्याशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर फायनान्स व्यवहाराचे डिटेल्स मिळवून व्यवसायिकाच्या बँकखात्यातून तब्बल 50 लाख रुपये ऑनलाईनरित्या काढून घेत फसवणूक केली आहे. अवघ्या 42 तासात सायबर चोरट्यांनी व्यवसायिकाला गंडविल्याचे निषन्न झाले आहे. याप्रकरणी अजित प्रल्हाद कांबळे (वय 39, रा. लोणी काळभोर हवेली) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 26 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत टिळक रस्त्यावरील फिनशुअर फायनान्शियल सर्व्हिसेस कार्यालयात घडली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित लोणी काळभोर परिसरात राहायला असून त्यांचा टिळक रस्त्यावर फिनशुअर फायनान्शियल सर्व्हिसेसचा व्यवसाय आहे. 26 नोव्हेंबरला ते सकाळी कामानिमित्त मुंबईला गेले होते. प्रवासामध्ये त्यांचा आयडियाचे सीमकार्ड असलेला मोबाईल अचानक बंद पडला. तो मोबाईल क्रमांक फायनान्स कंपनीच्या व्यवहारासाठी बँक खात्याशी कनेक्ट होता. प्रवासात असल्यामुळे मोबाईल नेटवर्क नसल्याचे अजितला वाटल्याने त्यांनी दुर्लक्ष केले. त्याच कालावधीत सायबर चोरट्यांनी अजितच्या बनावट कागदपत्रद्वांरे त्यांचा मोबाईल क्रमांक पुन्हा सुरू केला.

त्यानंतर अजितच्या बँक खात्यावरून सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या बँक खात्यावर तब्बल 50 लाख रुपये ट्रान्सफर केले. 27 नोव्हेंबरला अजित पुण्यात आले असता, त्यादिवशीही त्यांचा मोबाईल बंद असल्यामुळे ते आयडिया स्टोअरर्समध्ये गेले. त्यावेळी अजितला मोबाईल क्रमांक सुरू असल्याचे माहिती ग्राहक सेवा अधिकाऱ्याने दिली. त्यानंतर अजितने चौकशी केली असता, त्यांच्या बँक खात्यावरून 50 लाख रुपये ट्रान्सफर झाल्याचे समजले. त्यानंतर अजित यांनी खडक पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार तक्रारीची प्राथमिक चौकशी करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम चक्रे अधिक तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या