बेळगावमध्ये कोरोना रुग्णांसाठी मोबाईल ऑक्सिजन बस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या दुसऱया लाटेत रुग्णांना मोठय़ा प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासताना दिसत आहे. ऑक्सिजनअभावी रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी कर्नाटकात ‘मोबाईल ऑक्सिजन बस’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे.  बेळगावमध्ये जिल्हा रुग्णालयाच्या आवारात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

होम आयसोलेशनमध्ये असणाऱया किंवा खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱया रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासल्यास त्वरित ही मोबाईल ऑक्सिजन बस तेथे पोहचणार असून रुग्णाला त्वरित ऑक्सिजन मिळण्याची व्यवस्था केली जाणार आहे. बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेम यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालय आवारात या मोबाईल ऑक्सिजन बसचे उद्घाटन करण्यात आले.

काही वेळा रुग्ण रुग्णालयामध्ये दाखल होण्यासाठी आलेला असताना ऑक्सिजनची गरज भासल्यास रुग्णालयाच्या आवारात असलेल्या मोबाईल ऑक्सिजन बसमध्ये रुग्णाला ऑक्सिजन पुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णालयामध्ये दाखल करून घेण्यास काही कारणाने उशीर झाला तरी रुग्णाला ऑक्सिजन मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

प्रवासी बसमध्येच ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था करून मोबाईल ऑक्सिजन बस तयार करण्यात आली आहे. बसमध्ये ठरावीक अंतर सोडून ऑक्सिजन सिलिंडर बसविण्यात आले आहेत. मोबाईल ऑक्सिजन बसमुळे रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन मिळण्यास मदत होणार आहे.