
मोबाईलमधला बॅलेन्स संपल्याने त्याचा ऑनलाईन भरणा करणाऱ्या तरुणाला 15 हजार रुपयांचा चुना लागला आहे. प्रदीप असे या युवकाचे नाव असून तो लोटे औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत काम करतो. प्रदीप याच्या मोबाईलचा रिचार्ज संपला असल्याने त्याने गुगल पे वरून 48 रुपयांचा ऑनलाईन रिचार्ज केले. मात्र रिचार्ज झाला नाही. त्यामुळे त्याने व्होडाफोनच्या कस्टमर केअर सेंटरला फोन केला. व्होडाफोनने आपल्याकडून काहीही अडचण नसून तुम्ही गुगल पेशी संपर्क साधा असा सल्ला दिला. सल्ल्यानुसार त्याने गुगल पेच्या कस्टमर केअरला फोन केला. मात्र ज्या नंबरवर त्याने फोन केला तो घोटाळेबाजांचा नंबर होता. या घोटाळेबाजांनी प्रदीपला एक लिंक दिली. प्रदीप ही लिंक ओपन केली असता त्याला काही माहिती विचारण्यात आली. ती माहिती तो देत असतानाच त्याच्या बँक खात्यातून 15 हजार 699 रुपये गायब झाले. प्रदीप याने याबाबत खेड पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलीस तपास करत आहेत.

























































