
सामना प्रतिनिधी । मुंबई
रात्रीच्या काळोखात सर्व झोपल्यावर घरात घुसून मोबाईल चोरणारा चोरटा टिळकनगर पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याच्याकडून चोरीचे दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.
पी. एल. लोखंडे मार्गावरील गरीब नगरात सलग दोन रात्री दोन घरांतून मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार टिळकनगर पोलीस ठाण्यात देण्यात आली. याची तत्काळ दखल घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल अंबवणे, अंमलदार केशव तकीक, बनकर, भालेराव, धनावडे या पथकाने शोधमोहीम राबवून रात्री अंधारात घरातील मोबाईल चोरणाऱ्या सागर वाघमारे (19) या तरुणाला शोधून काढले. देवनार येथे राहणाऱ्या सागरकडून पोलिसांनी चोरीचे चार मोबाईल जप्त केले आहेत.





























































