
सामना प्रतिनिधी, मुंबई
गर्दीचा फायदा घेत लोकलमध्ये चढते अथवा उतरते वेळी प्रवाशांच्या खिशातील मोबाईल लंपास करणारा सराईत चोर दादर रेल्वे पोलिसांच्या हाती लागला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचे दहा मोबाईल हस्तगत केले आहेत. इम्रान बेग मोहम्मद बेग मिर्झा (२९) असे त्या चोराचे नाव आहे. नागपाडा येथे राहणारा इम्रान मोबाईल चोरण्यात तरबेज आहे.
बुधवारी दादर रेल्वे स्थानकातील फलाट क्रामांक सहावर आलेल्या जलद लोकलमधून शशिकांत गायकवाड हे उतरत असताना त्यांचा १३ हजार किमतीचा मोबाईल चोरण्यात आला होता. त्यामुळे त्यांनी दादर रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे, आयएपीआय नीलेश वाजे, उपनिरीक्षक प्रदीप होलगे अंमलदार शिंदे, लिंगाळे, पाटील या पथकाने गुह्याचा तपास सुरू केला.
दरम्यान, गुरुवारी फलाट क्रमांक एकवर माटुंगा बाजूकडच्या दिशेला इम्रान संशयास्पद हालचाल करताना पथकाच्या नजरेस पडला. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने बुधवारी केलेल्या मोबाईल चोरीच्या गुह्याची कबुली दिली तसेच त्याच्याकडे चोरीचे दहा मोबाईल सापडले.


























































