परदेशी बनावटीचे पिस्तूल आणि 14 जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी मॉडेलला बोरिवली रेल्वे पोलिसांनी अटक केली. अभयकुमार उमेशकुमार चौरसिया असे त्याचे नाव असून अटक करून त्याला न्यायालयात हजर केले होते. शुक्रवारी बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्याचे शिपाई श्रीरंग माने, उपनिरीक्षक महाडिक हे गस्त करत होते. गस्तीदरम्यान त्यांना अभयकुमार हा ट्रॉली बॅग घेऊन जाताना दिसला. पोलिसांनी त्याला थांबवले. त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली.
चौकशीदरम्यान अभयकुमारने बॅग उघडण्यास नकार दिला. त्यानंतर त्याने अधिकाऱ्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्याला पोलीस ठाण्यात आणून बॅग तपासली असता त्या बॅगेत 1 पिस्तूल आणि 14 जिवंत काडतुसे होती. पोलिसांनी त्या पिस्तूल आणि काडतुसांबाबत अभयकुमारकडे चौकशी केली. त्याने माहिती देण्यास नकार दिला. त्याच्या विरोधात विविध कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करून त्याला अटक केली.
अभयकुमारने ते पिस्तूल आणि काडतुसे बिहार येथून खरेदी केली होती. त्याने काही मॉडेल, अभिनेते यांच्यासोबत कामदेखील केल्याचा त्याने दावा केला आहे. काही काळासाठी तो गावी राहण्यास गेला होता. शुक्रवारी तो मुंबईत आला तेव्हा त्याला बोरिवली स्थानकात पकडण्यात आले. त्याला ते पिस्तूल कोणी दिले होते, त्याचे अन्य कोणी साथीदार आहेत का, तो आंतर राज्य टोळीचा सदस्य आहे का याचा तपास केला जात आहे. अभयकुमारला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याचे वरिष्ठ निरीक्षक दत्ता खुपेकर यांनी सांगितले.