मॉडेलचे बोल्ड फोटो व्हायरल करणारा अटकेत 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शरीरसुखास नकार दिल्याने मॉडेलचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणाऱयाला मालाड पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. ओमकार ऊर्फ ओमप्रकाश राजू तिवारी असे त्याचे नाव आहे. त्याने  एका प्रसिद्ध प्रॉडक्शन हाऊसचा कास्टिंग डायरेक्टर असल्याचे मॉडेलला सांगितले होते.

तक्रारदार ही मॉडेल असून ती मूळची पश्चिम बंगालची रहिवासी आहे. ती त्या सध्या मालाड परिसरात राहते. काही दिवसांपूर्वी चित्रपटात करीअर करण्यासाठी ती मुंबईत आली होती. मुंबईत आल्यावर तिने ओमकारची एक वेबसाईट पाहून त्याच्याशी संपर्क केला. संपर्क केल्यावर ओमकारने आपण अनेक मॉडेलचे फोटोशूट केले आहे. तसेच एका प्रसिद्ध प्रॉडक्शन हाऊसमध्ये कास्टिंग डायरेक्टर असल्याच्या भूलथापा मारल्या. त्या भूलथापांना ती मॉडेल बळी पडली. आपली अनेक अभिनेत्यांशी थेट ओळख आहे. तुलादेखील चित्रपटात काम देतो अशा त्याने भूलथापा मारून मॉडेलचे बोल्ड फोटो पाठवण्यास सांगितले. त्यावर विश्वास ठेवून मॉडेलनेदेखील ओमकारला बोल्ड फोटो पाठवले.

फोटो पाठवल्यानंतर ओमकारने मॉडेलकडे शरीरसुखाची मागणी केली. त्याला मॉडेलने नकार दिला. त्यानंतर तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल करू अशी धमकी देऊन ते फोटो ओमकारने व्हायरल केले.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोची माहिती मॉडेलला समजली. तिने मालाड पोलीस ठाणे गाठले. मॉडेलच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वरिष्ठ निरीक्षक धनंजय लिगाडे यांच्या पथकातील सहायक निरीक्षक विवेक तांबे, पोलीस हवालदार कांडे, गिरी, शेख यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना ओमकारची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक टिटवाळा येथे गेले. तेथून ओमकारला ताब्यात घेऊन अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.