
कन्याकुमारीपासून निघालेल्या खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचे नांदेडमध्ये जोरदार स्वागत झाले. या यात्रेदरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. काँग्रेसने संविधानाचे रक्षण केले. काँग्रेसने संविधानाचे रक्षण केले नसते तर नरेंद्र मोदी कधीच पंतप्रधान झाले नसते, असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. याशिवाय, बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकारला सवाल केला. दरवर्षी 2 कोटी नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले? आता फक्त 75,000 नोकऱ्या देत आहेत. 18 कोटी नोकऱ्या कुठे आहेत? असा सवालही मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.
भाजप नेते अनेकदा विचारतात की, काँग्रेसने देशासाठी काय केले. काँग्रेस सरकारने स्थापन केलेल्या पीएसयू आता विकल्या जात आहेत. आम्ही संविधान वाचवले, म्हणून तुम्ही पंतप्रधान झालात, असे म्हणत मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. मोदी सरकार विमानतळ आणि बंदरे विकत असून देशाची संपत्ती काही निवडक लोकांच्या हातात जात असल्याचा आरोपही खरगे यांनी केला.

























































