खूशखबर…केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ!

1730

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना केंद्र सरकारने खूशखबर दिली आहे. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर येस बँकेला संकटातून बाहेर काढण्यासाठी आखण्यात आलेल्या योजनेलाही कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. तसेच कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी हिंदुस्थानने चांगली कामगिरी केली असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी बैठकीत सांगितले. परराष्ट्र मंत्रालय,नागरी हवाई उड्डाण मंत्रालय,आरोग्य मंत्रालय, कॉमर्स मंत्रालय आणि वित्त मंत्रालयाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी महागाई भत्ता देण्यात येतो. देशभरात महागाई वाढल्याने गेल्या काही दिवसांपासून महागाई भत्ता वाढवण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांचा महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला आहे. केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांना मार्च महिन्याच्या वेतनासह महागाई भत्ता मिळेल, अशी माहिती केंद्रीय वित्त राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी राज्यसभेत लिखीत उत्तरात दिली होती. देशात कोरोनाचा फैलाव होत असल्याने परराष्ट्र मंत्रालय, नागरी हवाई उड्डाण मंत्रालय, आरोग्य मंत्रालय, कॉमर्स मंत्रालय आणि वित्त मंत्रालयाच्या संयुक्त सचिवांना दररोज पत्रकार परिषद घेऊन कोरोनाबाबत अपडेट देण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या