स्वागत दिवाळी अंकांचे – मोडी दर्पण

मुंबई महापालिकेत शिक्षक म्हणून निवृत्त झालेल्या सुभाष लाड यांनी संपादित केलेला ‘मोडी दर्पण’ हा मोडी लिपी शिकण्याची इच्छा असलेल्यांसाठी अतिशय उपयुक्त आणि मार्गदर्शक असा अकरावा दिवाळी अंक आहे. या दिवाळी अंकाचे वैशिष्टय़ म्हणजे, नव्याने मोडी शिपू इच्छिणाऱयांसाठी यात मोडी लिपीची मूळाक्षरे, बाराखडी, छोटे छोटे मोडीचे पाठ आणि मोडीतच लिहिलेले लेख व कविता आहेत. त्याशिवाय मोडीतज्ञ सुनील कदम यांचा मोडी लिपीतील मराठय़ांच्या इतिहासाची गुरुकिल्ली, पंकज भोसले यांच्या हस्ताक्षरातील शिवरायाची तलवार, डॉ. केदार फाळके यांचा छत्रपती शिवाजी महाराज आणि राजापूर या विषयावरचे लेख अतिशय माहितीपूर्ण आहेत. सुनील कदमांचा गजलक्ष्मी, श्रुती बर्वे-भिडे यांचा मराठीतील प्रथम शिलालेख अक्षी हे मोडी व देवनागरी दोन्ही लिपींतून लिहिलेले लेख आहेत. यात इतिहास विषयावरचे अतिशय अभ्यासपूर्ण लेख आहेत. मोडीशिवाय खारोष्टी लिपी, ब्राह्मी लिपी आदि लिप्यांवरही लेख आहेत.

संपादक – सुभाष लाड, मूल्य – 120 रुपये.

वसुंधरा मोडीवृत्त

दोन तपांपासून मोडी लिपीच्या प्रचार, प्रसाराचे कार्य करणाऱया महेश जोशी यांचे ‘वसुंधरा मोडीवृत्त’ या मोडी लिपीच्या वाचक, अभ्यासकांसाठी गेले पाच वर्षांपासून नियमित प्रकाशित होणाऱया नियतकालिकाचा यंदाचा दिवाळी अंक शंभर टक्के हस्तलिखित मोडी लिपीतून तयार केला गेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर गावोगावी जाऊन मोडी लिपी शिक्षणाच्या कार्यशाळा घेणाऱया महेश जोशी यांनी दिवाळी अंकात प्रत्येक लेखकाच्या हस्ताक्षरात त्याचे लेख जसेच्या तसे प्रकाशित केले आहेत. या नियतकालिकाचे संपादक मोडी लेखन तर शिकवतातच, शिवाय या नियतकालिकाच्या माध्यमातून मोडीप्रेमींना मोडीतून लिहायलाही प्रवृत्त करतात. सुनील कदम यांच्या दोन लेखांशिवाय या अंकात भाऊराव घाडीगावकर यांनी लिहिलेले समर्थ रामदासस्वामी कृत लेखन क्रिया निरूपण, किशोर पाटील लिखित यशस्वी जीवन, संजय मिस्त्राr लिखित मोडी लिपी संवर्धनाची चळवळ, दौलताबादच्या किल्ल्यातील तोफांचे प्रदर्शन, गुरुनाथ नाईकांच्या रहस्यकथा आणि दिवाळीचा बोनस हे लेख, अॅड. विलास कडू यांचा मोडी लिपी आणि माझे योगदान हा लेख व मोडीची गोडी ही कविता, अॅड. ओंकार चावरे यांचा भोरजवळील ऐतिहासिक अमृतेश्वर मंदिर अशा अनेक कथा कविता आणि लेख आहेत.

संपादक – महेश जोशी, मूल्य – 300 (वार्षिक वर्गणीसह)

आपली प्रतिक्रिया द्या