शमीची शक्यता कमीच; इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन कसोटींना मुकणार

हिंदुस्थानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी इंग्लंडच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांस मुकणार आहे. घोटय़ाच्या दुखापतीतून तो अद्याप न सावरल्यामुळे त्याची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठीही निवड करण्यात आली नव्हती. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला 25 जानेवारीपासून प्रारंभ होत असून दुसरा सामना 2 फेब्रुवारीला विशाखापट्टणम येथे खेळला जाणार आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये शमी खेळण्याची शक्यता कमीच आहे.

‘बीसीसीआय’च्या एका वरिष्ठ सूत्राने दिलेल्या माहितीनुसार शमीने अद्याप गोलंदाजी करायला सुरुवात केलेली नाही. त्याला आपली फिटनेस सिद्ध करण्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये जावे लागणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांत खेळणे त्याच्यासाठी अवघड वाटत असल्यामुळे त्याची पहिल्या दोन कसोटीसाठी निवड होण्याची शक्यता कमीच आहे.