
जम्मू-कश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्यात आले, मात्र यामुळे तेथील समस्या पूर्णपणे संपलेल्या नाहीत, असे मोठे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शनिवारी नागपूरमध्ये केले. कश्मीरात अजूनही लोकसंख्येचा एक वर्ग आहे, ज्या वर्गाला आजही स्वातंत्र्याची प्रतीक्षा आहे, असे ते म्हणाले.
नागपुरात पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. कलम 370 हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाकडे एक ऐतिहासिक निर्णय म्हणून पहिले जात आहे. याचदरम्यान कश्मीरच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना सरसंघचालक भागवत यांनी केलेल्या या विधानाला महत्त्व आले आहे. मी अलीकडेच जम्मू-कश्मीरचा दौरा केला. कलम 370 रद्द केल्यामुळे तेथील विकासाचा रस्ता मोकळा झाल्याचे दिसले. मात्र प्रश्न पूर्णपणे संपलेले नाहीत. एका वर्गाला अजूनही स्वातंत्र्याची प्रतीक्षा आहे. समाजाला काश्मिरातील लोकसंख्येच्या या वर्गापर्यंत पोहोचले पाहिजे. जेणेकरून त्या वर्गाला हिंदुस्थानशी एकीकृत केले जाऊ शकेल, असे भागवत म्हणाले. पूर्वी जम्मू व लडाखला दुजाभावाची वागणूक मिळायची, कश्मीर खोऱयातील सुविधांचा 80 टक्के निधी लोकांच्या भल्याचा विचार न करता स्थानिक नेत्यांच्या खिशात जायचा. आता परिस्थिती बदललीय आणि लोक आनंदाने जीवन जगताहेत. गेल्या महिन्यात मुंबईतील एका कार्यक्रमात मी जम्मू काश्मीरच्या मुस्लिम विद्यार्थ्यांची भावना जाणून घेतली. त्यांना हिंदुस्थानी बनून राहायचेय, असे भागवत यांनी सांगितले.
समस्या तिथेच आहे!
कश्मीरातील अनेकजण हिंदुस्थानी राष्ट्रवाद जाणतात. काही लोक आहेत, ज्यांना भ्रष्ट नेते तुरुंगात गेल्याचा आणि विकास झाल्याचा आनंद आहे. परंतु आम्हाला स्वातंत्र्य मिळाले तर ते चांगले होईल, अशी भावना त्यांच्या मनात आहे. समस्या तिथेच आहे, असे भागवत म्हणाले. समाजाने त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे व ते हिंदुस्थानचे आहेत ही भावना त्यांच्या मनात निर्माण केली पाहिजे, अशी अपेक्षा भागवत यांनी व्यक्त केली.
दहशतविरोधी कारवाईतील अडथळा दूर झालाय
कलम 370 दहशतवादविरोधी कारवाईच्या आड यायचे. परंतु आता दहशतवाद्यांना कोणीही घाबरत नाही. जे लोक आपल्या मुलांच्या हातामध्ये पुस्तकांऐवजी दगड द्यायचे, त्या लोकांनी आता दहशतवाद्यांचे काwतुक करणे थांबवले आहे. आता खुले वातावरण आहे. उद्या निवडणुका होतील आणि नवीन सरकार स्थापन होईल, असे मतही भागवत यांनी व्यक्त केले.
कलम 370 रद्द केल्यामुळे तेथील विकासाचा रस्ता मोकळा झाल्याचे दिसले. मात्र प्रश्न पूर्णपणे संपलेले नाहीत. एका वर्गाला अजूनही स्वातंत्र्याची प्रतीक्षा आहे.

































































