
सामना प्रतिनिधी । संगमेश्वर
संगमेश्वर येथील मिसळसाठी प्रसिध्द असणाऱ्या स्वामी समर्थ हॉटेलचे तरुण व्यावसायिक मोहन राजाराम चव्हाण यांचे वयाच्या ४० व्या वर्षी शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्याने नुकतेच दुख:द निधन झाले. त्यांच्या तडकाफडकी जाण्याने परिसरावर शोककळा पसरली.
मासेमारी या मूळ व्यवसाला बगल देत मोहन चव्हाण यांनी अतिशय खडतर अशी वाटचाल करीत संगमेश्वर येथील ए टू झेड मार्केट मध्ये एका गाळ्यात वडापाव आणि मिसळ या दोन पदार्थांसाठी हॉटेल सुरु केले. अल्पावधीतच आपल्या खास चवीमुळे त्यांच्या हॉटेलला उत्तम ग्राहक मिळू लागले. हॉटेल मध्ये होणारी गर्दी आणि ग्राहकांना वाट बघत उभे राहावे लागते म्हणून मोहन यांनी हॉटेल समोर खास ग्राहकांना बसण्यासाठी आणखी एक गाळा भाड्याने घेतला. कमालीची मेहनत घेत त्यांचा व्यवसाय यशस्वीपणे सुरु होता. मोहन यांना हॉटेल व्यवसायात त्यांची पत्नी देखील खूप मोठी मदत करत असे. स्वामी समर्थ हॉटेलची मिसळ महाविद्यालयीन युवक युवतींमध्ये खास प्रसिद्ध होती. मोहन यांना ताप आला. या तापाकडे त्यांनी व्यवसायामुळे प्रथम दुर्लक्ष केले आणि नंतर त्यांना थेट रत्नागिरी येथे अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. शरीरातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण खूपच कमी झाल्याने शर्थीचे उपचार सुरु असतांनाच मोहन यांची प्राणज्योत अवघ्या ४० व्या वर्षी मालवली. त्यांच्या अकाली निधनाचे वृत्त संगमेश्वर येथे समजताच तीव्र दुख: व्यक्त करुन श्रध्दांजली वाहण्यात आली. मोहन यांचे मूळ गांव राजापूर तालुक्यातील ओणी हे होते मात्र वास्तव्याला ते कायम बुरंबी येथे असल्याने त्यांच्यावर बुरंबी येथेच शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी व मुली असा परिवार आहे.
































































