मालवणमध्ये शिवकालीन मोहरम ताजिया मिरवणूक उत्साहात

506

मोहरम ताजिया सर्वधर्म समभावाचे प्रतीक म्हणून ओळखला जाणारा उत्सव. मालवणात मुस्लिम बांधवांच्या वतीने मंगळवारी सायंकाळी मिरवणुकीसह प्रथेप्रमाणे मोहरम उत्सव साजरा करण्यात आला. किल्ले सिंधुदुर्ग आणि मालवणवासीयांच्या ऐक्याचे प्रतिक असणाऱ्या ‘मोहरम ताजियाकडे’ शिवकालीन उत्सव म्हणूनही पाहिले जाते. मालवण बाजारपेठ-भरड-ते राजकोट अशी ढोल ताशांसह ताबूत ताजिया मिरवणूक काढण्यात आली.

किल्ले सिंधुदुर्गमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे किल्ल्याच्या रक्षणासाठी असलेले किल्लेदार मुस्लिम बांधव होते. त्यापासून हिंदू व मुस्लीम धर्मात सर्वधर्म समभावाचे प्रतिक असणारा मोहरम ताजिया उत्सव शिवरायांनी मालवणात सुरु केला. आज 354 वर्षे लोटली तरी शिवकालीन प्रथा आजही हिंदू मुस्लिम बांधवांच्या वतीने साजरी होताना दिसते. मोहरम म्हणजे हजरत, मोहम्मद पैगंबर, हजरत अली (रजी), हजरत, फातिम (रजी), इमाम हुसेन, हजरत इमाम हुसेन या पाच पवित्र आत्म्यांचे प्रतिक म्हजेच ताबूत मानले जाते. किल्ले सिंधुदुर्ग येथील मुस्लिम हिंदू बांधव एकत्र येत बुधवारी दुपारी 1 वाजता शिवराजेश्वर मंदिरात ताबूत आणण्यात आले. यावेळी शिवराजेश्वर मंदिरात प्रार्थना करण्यात आली. शिवराजेश्वर मंदिरासभोवताली ताबूत मिरवणूक झाल्यानंतर होडीच्या सहाय्याने मालवण मेढा पिराची भाटी येथे आणण्यात आली. येथे आणखी एक ताबूत सजवून मालवण मेढा बाजारपेठ भरड मार्गे फोवकांडा पिंपळ ते मेढा राजकोट अशी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.

या मिरवणुकीतील ताबूत आकर्षक फुलांनी सजवण्यात आला होता. मिरवणुकीत मालवणातील हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मेढा राजकोट समुद्र किनारी या ताजीयाचे सायंकाळी विसर्जन करण्यात आले. यावेळी मालवण पोलिसांच्यावतीने चोख बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकदिशा मार्गाने दुहेरी वाहतूक सुरु ठेवण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या