निसर्गमैत्र – औषधी गुणांनी परिपूर्ण मोह वृक्ष

अभय मिरजकर << [email protected]>>

कितीही चांगले गुण असू द्या, लोक एक तरी दोष काढतातच. याचे उत्तम उदाहरण म्हणजे देशी वृक्ष मोह. मोहाचे नाव काढले की सोबत दारूचे नाव जोडूनच येते. ‘मधुका लाँगिफोलिया’ असे शास्त्राrय नाव असणारा मोह हा एक पानगळी, औषधी, धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा वृक्ष आहे. मोह हा उष्ण, कोरडय़ा जमिनीत येणारा पानझडी वृक्ष असून हिंदुस्थानात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. वन संवर्धनासाठी हा एक उपयुक्त वृक्ष आहे. मोहाला आदिवासींचा कल्पवृक्ष असे म्हणतात. कारण मोहाच्या फुला-फळांपासून त्यांना रोजगार मिळतो. तसेच फुला-फळांचा अन्न म्हणूनही ते उपयोग करतात. बैलघाणीत बियांचे तेल काढतात, त्याचा स्वयंपाकात उपयोग करतात. बिया वाटल्यावर तुपासारखे तेल निघते म्हणून मोहाला इंग्रजीत ‘बटर ट्री’ असेही म्हणतात.

 मोहाची फुले रानावनांत राहणाऱया आदिवासींच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन आहे. त्यामुळे याला देवत्व प्राप्त झाले आहे. उन्हाळय़ात आदिवासी यांची उपजीविका मोहाच्या फुलांवर होते. मोहाच्या फुलांत साखर आणि अल्कोहोलचे प्रमाण चांगले असते. त्यापासून आदिवासी मद्य बनवितात. विवाह व इतर सणांच्या दिवशी मोहाचे मद्य प्राशन करणे आदिवासी पवित्र समजतात. कोणताही आजार झाला की, आदिवासी मोहाच्या दारूचा औषध म्हणून उपयोग करतात. मोहाच्या पानापासून पत्रावळय़ा तयार केल्या जातात, तसेच गायी-गुरांना मोहाच्या पानांचा सकस आहार देतात. त्यामुळे दुभती जनावरे भरपूर दूध देतात.

मोहाच्या फुलापासून पुरणपोळी बनवली जाते व इतर काही खाण्यायोग्य पदार्थ बनवले जातात. मोहाच्या हिरव्या फळाची भाजी पण करतात, पिकलेली फळे खातात. याशिवाय औषधी आणि इतर अनेक उपयोगी असलेला हा वृक्ष आहे. मोहाची फुले व फळे मार्च ते मे या कालावधीत मिळतात. या झाडाची मुळे व फांद्या इंधन म्हणून वापरतात. मोहाचे लाकूड मोठे असते, पण  टिकावू नसते. टोळ म्हणजे मोहाच्या झाडाचे फळ आहे. या टोळीचे तेल काढतात. टोळीच्या आतल्या बियांपासून साबण बनवतात. टोळीचा जेवणात बराच उपयोग होतो. मोहाचे फुल पौष्टिक असते म्हणून गरोदर बाईला, आजारी माणसाला ते खायला देतात.

मोहाच्या बियांमध्ये सुमारे 45 ते 50 टक्के खाद्य तेल आणि 16 टक्के प्रथिने आहेत. तेलाचा उपयोग त्वचा रोगावरील औषधे, साबण निर्मिती, इंजिन ऑइल म्हणून होतो. उत्तर प्रदेशचा पूर्व भाग, छत्तीसगड, महाराष्ट्र, बिहार, झारखंड, ओरिसा, बंगाल, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरातच्या डांग भागात कमी-अधिक प्रमाणात हे वृक्ष आढळतात. मोहाच्या पेंडीचा उपयोग शेतीला सेंद्रिय खत व कीटकनाशक म्हणून होतो. झाडाची उंची साधारण 15 ते 20 मीटर असते. झाडाची मुळे जमिनीत खोलवर जातात. खोड मजबूत व टणक असते. लाकूड चांगले टणक, मजबूत आहे. वाळवी लागत नाही, पाण्यातही कुजत नाही. लाकडाचा उपयोग घरकाम, फर्निचर, लाकडी खेळणी, तसेच कृषी अवजारे बनविण्यासाठी करतात. लिखाणाचे कागद, प्रिंटिंग पेपर बनविण्यासाठी लाकडाचा लगदा वापरतात. शेतीसाठी यापासून चांगले सेंद्रिय खत मिळते. मातीमधील  हुमणी, मुळे कुरतडणारी अळी, खेकडे व सूत्रकृमी यांच्या नियंत्रणावर एक चांगले कीटकनाशक म्हणून याचा वापर केला जातो. सुकलेल्या फुलांमध्ये 71 टक्के साखरेचे प्रमाण असते. एक टन वाळलेल्या फुलांपासून 130 लिटर विशुद्ध अल्कोहल तयार होते.