
मुद्दल रक्कम आणि व्याजापेक्षा जास्त रक्कम घेऊनही वारंवार पैशाची मागणी करून आणि घारगाव पोलिसांचा धाक दाखवून सतत त्रास देणाऱया सावकाराच्या छळाला कंटाळून दाम्पत्याने जिल्हाधिकाऱयांकडे स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली आहे. दाम्पत्याच्या तक्रार अर्जाची चौकशी करून उपनिबंधक कार्यालयाने साकूर येथील दोन सावकारांवर छापा टाकून कारवाई केली आहे.
संगमनेर तालुक्यातील साकूर येथील संगीता व विलास दौलत वाकचौरे या दाम्पत्याने सावकाराच्या जाचातून मुक्ती मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी अनधिकृत सावकारावर कारवाई करण्याचे आदेश दिले. शुक्रवारी दुपारी ‘त्या’ सावकारांच्या घरावर संगमनेर उपनिबंधक कार्यालयाने छापा मारत चेक, खरेदीखत आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केल्याची माहिती उपनिबंधक संतोष कोरे यांनी दिली आहे.
साकुर येथील सावकार राहुल किसन डोंगरे आणि सचिन बन्सी डोंगरे यांच्याकडून व्यवसायासाठी व्याजाने कर्ज घेतले. त्यांनी ठरलेल्या रकमेच्या व्याजापेक्षा चारपट पैसे वसूल केले. तरीही आणखी पैशाची मागणी करत आहेत. आमचे घर बळकाविण्यासाठी वेठीस धरत आहेत. कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचा दबाव टाकत होते. त्यामुळे या कुटुंबाने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देत इच्छा मरणाची मागणी केली होती.
संगमनेरचे उपनिबंधक संतोष कोरे व त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार अधिकारी राजेंद्र वाकचौरे, अल्ताफ शेख, ज्ञानेश्वर गोरे, सहायक सहकार अधिकारी प्रदीप वीरनारायण, बी. एन. चतुरे या पथकाने डोंगरे यांचे घर आणि दुकानावर पोलीस बंदोबस्तात कारवाई केली.
पोलिसांकडून दाम्पत्याला धमकी
तक्रारदार दाम्पत्याला घारगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे यांची भीती दाखवून सावकारांकडून दबाव आणला जात होता. पतंगे यांनी या दाम्पत्याला घारगाव पोलीस ठाण्यात बोलावून धमकीदेखील दिली असल्याचे जिल्हाधिकाऱयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यामुळे नेहमीच वादग्रस्त असलेले घारगाव पोलीस ठाणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

























































