मोना डार्लिंग पुन्हा सेवेत येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वारंवारच्या तांत्रिक बिघाडामुळे पाच महिने ठप्प असलेली ‘मोनोरेल’ अखेर मे महिन्यात पुन्हा प्रवासी सेवेत धावण्याची शक्यता आहे. सध्या मोनोरेलच्या मार्गावर स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकन सुरू करण्यात आले आहे. तसेच सुरक्षात्मक चाचणी व इतर तयारी जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मोनोरेल ट्रेनची पुरवठादार कंपनी असलेल्या ‘मेधा सर्वो ड्राइव्हस’ला दिल्या आहेत.

दक्षिण मुंबईतील संत गाडगेबाबा महाराज चौक ते चेंबूरदरम्यान धावणाऱ्या मोनोरेलची सेवा 20 सप्टेंबर 2025 पासून बंद आहे. मोनोरेलच्या जुन्या रेकमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड निर्माण होत होते. त्यामुळे प्रवासी सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर  मोनोरेलची 19.54 किमी लांबीच्या मार्गावरील प्रवासी सेवा बंद करण्याची नामुष्की एमएमआरडीएवर ओढवली होती. तब्बल पाच महिने ठप्प असलेली मोनोरेलची सेवा अखेर ट्रकवर आणण्याच्या कार्यवाहीला गती देण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने या महिन्यात स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकन सुरू करण्यात आले आहे. महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशनने मोनोरेलच्या ऑपरेशन्स आणि देखभालीसाठी खाजगी ऑपरेटरची नियुक्ती केली आहे. मोनोरेलची सेवा पुन्हा सुरू करताना यापुढे हैदराबाद येथील पॉवर मेक प्रोजेक्ट्स लिमिटेडकडे मोनोरेलच्या देखभालीची जबाबदारी राहणार आहे. तांत्रिक बिघाडांमुळे सेवा बंद होण्यापूर्वी मोनोरेलच्या मार्गावर दररोज 18 हजार मुंबईकर प्रवास करीत होते. सुरक्षेच्या गंभीर प्रश्नामुळे मोनोरेलच्या प्रवासी संख्येवर प्रतिकूल परिणाम झाला होता.

‘सीएमआरएस’ मंजुरीनुसार  सेवेचा नवा मुहूर्त ठरणार

‘मेधा सर्वो ड्राइव्हस’ने मोनोरेलच्या 10 नव्या रेकचा पुरवठा केला आहे. महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशनने 7 मेच्या तारखेचे उद्दीष्ट ठेवून चाचणी आणि इतर तयारीचे वेळापत्रक जुळवण्याच्या सूचना ‘मेधा सर्वो ड्राइव्हस’ला केल्या आहेत. सध्या रोलिंग स्टॉक, सिग्नलिंग व टेलिकम्युनिकेशन, ऑटोमॅटिक भाडे संकलन गेट्स आणि प्रवासी माहिती प्रणालींची चाचणी केली जात आहे. मेट्रो रेल्वे सेफ्टीच्या (सीआरएमएस) कार्यरत किंवा निवृत्त आयुक्तांच्या नियामक मंजुरीनुसार मोनोरेलची सेवा पुन्हा सुरू करण्याची तारीख ठरणार आहे.