मुंबई, कोकणात शुक्रवारपासून पाऊसधारा; 20 जूनपासून राज्यात मान्सून सक्रिय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात मान्सूनचे आगमन झाले असले तरी मुंबईसह राज्यात मान्सून सक्रिय व्हायला आणखी पाच दिवस म्हणजे 20 जून उजाडणार आहे. मात्र, मुंबईसह कोकणात शुक्रवारपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसणार आहे, अशी माहिती कुलाबा वेधशाळेच्या वरिष्ठ संशोधक सुषमा नायर यांनी दिली.

राज्यात गेल्या गुरुवारपासून मान्सूनचे जोरदार आगमन झाले आहे. मुंबईतही गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी ढगांच्या गडगडाटासह जोरदार कोसळल्यानंतर पाऊस गायब झाला. गेले तीन दिवस मुंबईत ढगाळ वातावरण आहे. मात्र, आज मुंबईत काही भागात जोरदार सरी कोसळल्या तर उपनगर कोरडे राहिले. गेले काही दिवस ढगाळ वातावरण असून पाऊस मात्र हुकावणी देत आहे. दरम्यान, मुंबईसह कोकणात विजेच्या कडकडाटासह तुरळक आणि मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत.

सध्या किनारपट्टीच्या भागात पाऊस
सध्या मौसमी वाऱ्यामुळे पश्चिम किनारपट्टीच्या भाग हा पावसासाठी अनुकूल आहे. त्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीचा भागात तुरळक आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. येत्या शुक्रवारपासून पुढील काही दिवसांत तो राज्यात उत्तरोत्तर सक्रिय होत जाणार आहे. मध्य महाराष्ट्र आणि राज्याच्या पुढील भागात अजूनही उकाडा कायम आहे.

…तोपर्यंत तुरळक सरी, ढगाळ वातावरण
राज्यात मान्सूनचे आगमन झाले असले तरी राज्यभर सक्रिय व्हायला आणखी पाच दिवस लागणार आहे. मात्र, तोपर्यंत तुरळक आणि जोरदार सरी कोसळणे आणि मध्येच उन्ह किंवा ढगाळ वातावरण असणे, अशी पावसाळी स्थिती कायम राहणार आहे. त्याचबरोबर ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या तुरळक सरी कायम राहतील.