चांदवडला परतीच्या पावसाचा तडाखा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नाशिक

चांदवड तालुक्याच्या पूर्व व पश्चिम भागाला मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱयासह परतीच्या पावसाने झोडपले. देवरगाव येथे काही वेळ गारपीट झाली. यात सुमारे 260 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. एक पोल्ट्री शेड कोसळले तसेच एका गाईचा मृत्यू झाला.

चांदवड तालुक्यातील खडकजांब, वडाळीभोई, खडकओझर, जोपूळ येथे तासभर जोरदार पाऊस झाला. देवरगावला पाच ते दहा मिनिटे गारपिटीचा तडाखा बसला. हेमंत जाधव यांच्या गोठय़ावर झाड कोसळल्याने गाईचा मृत्यू झाला. बाबूराव कदम यांची रिकामी पोल्ट्री शेड जमीनदोस्त झाली. विद्युत खांब व झाडांच्या फांद्या कोसळल्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

देवरगाव येथे 90 हेक्टरवरील द्राक्षबागा व 20 हेक्टरवरील झेंडू फुलांच्या शेतीला गारांचा तडाखा बसला. प्रत्येकी 50 हेक्टर क्षेत्रावरील मका, कांदा व टोमॅटोचे पीक उद्ध्वस्त झाले आहे.