
सोसाटय़ाच्या वाऱ्यासह महाराष्ट्राला मान्सूनची आनंदवार्ता मिळाली आहे. दक्षिण कोकणात रत्नागिरीत आज मान्सून दाखल झाल्याची घोषणा हवामान विभागाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत असलेला बळीराजा आणि उकाडय़ाने हैराण झालेला सामान्य नागरिक असे सारेच सुखावले.
केरळमध्ये दरवर्षी साधारणपणे 1 जूनच्या आसपास दाखल होणारा मान्सून यंदा सात दिवस उशिराने 8 जून रोजी दाखल झाला. त्यानंतर मान्सूनने वेग घेतला असून अवघ्या तिसऱ्या दिवशीच महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. गोवा राज्य व्यापल्यानंतर दक्षिण कोकणमार्गे आज मान्सून महाराष्ट्रात पोहचला. रत्नागिरीत मान्सूनची वर्दी मिळाल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. मुख्य म्हणजे मान्सूनची आनंदवार्ता मिळाली असली तरी पावसाला अजून जोर नाही. रत्नागिरीत आज तुरळक सरी बरसल्या.
मान्सूनने केरळनंतर आतापर्यंत दक्षिण कोकणचा काही भाग, दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग, संपूर्ण गोवा, कर्नाटक, तामीळनाडू व आंध्र प्रदेशचा काही भाग व्यापला आहे.
मुंबई, ठाणे, पालघरसाठी यलो अलर्ट
गोवा, महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पालघर, कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उद्या वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून या भागासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. संपूर्ण विदर्भात 15 जूनपर्यंत विजांच्या कडकडाटांसह मान्सूनपूर्व वादळी पावसाची अधिक शक्यता आहे, असे सांगण्यात आले.
दोन दिवसांची भरपाई
केरळनंतर पाच ते सहा दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होतो. मात्र आधीच सात दिवस उशिराने केरळात आलेल्या मान्सूनने दोन दिवसांची भरपाई केली आणि तीनच दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीसाठी प्रतीक्षेत असलेला शेतकरी सुखावून गेला आहे. दमदार पाऊस झाल्यास पेरण्या सुरू करता येणार आहेत.
किनारपट्टी भागाला धोक्याचा इशारा
गुजरातसोबतच महाराष्ट्र, गोवा आणि अन्य किनारपट्टी भागासाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. वाऱ्याचा वेग वाढणार असल्याने आणि समुद्र खवळलेला राहणार असल्याने मच्छीमार आणि पर्यटकांना मनाई करण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
बिपरजॉयने धारण केले रौद्र रूप; गुजरातला धोका
अरबी समुद्रातून मार्गक्रमण करत असलेल्या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाने आज दुपारी दीडच्या सुमारास रौद्ररूप धारण केल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. हे वादळ मुंबईपासून 580 कि.मी. दूर असून गुजरातमधील सौराष्ट्र-कच्छ आणि पाकिस्तानच्या मांडवी-कराचीदरम्यान 15 जूनला दुपारपर्यंत किनारपट्टीवर धडण्याची शक्यता आहे. त्यावेळी वाऱ्याचा वेग ताशी 125-135 ते 150 कि.मी. इतका असण्याचाही अंदाज आहे. हा धोका लक्षात घेत कच्छ, जामगनर, मोरबी, गीर सोमनाथ, पोरबंदर, देवभूमी द्वारका जिह्यांसाठी हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
खरेदीसाठी दादर फुल्ल
मान्सूनच्या वर्दीने सगळेच सुखावले असून छत्री आणि रेनकोटची शोधाशोध सुरू झाली आहे. मुंबईतील प्रमुख बाजारपेठांमध्ये छत्री, रेनकोटसह पावसाळी खरेदीसाठी लगबग दिसून आली. रविवार असल्याने दादरची बाजारपेठ गर्दीने फुलून गेली होती.
मुंबईत आज दिवसभर सोसाटय़ाचा वारा सुटला होता. सायंकाळी आभाळ भरून आले आणि काही वेळ शिडकावा झाला.




























































