राज्यात पुन्हा सक्रीय झालेल्या मोसमी पावसाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडच्या अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. रायगडमध्ये कुंडलिका आणि अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर रत्नागिरीत खेड तालुक्यातील जगबुडी तसेच राजापूरच्या कोदवली नदीने रहिवाशांमध्ये धडकी भरवली आहे. कोकणात आणखी चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. तसेच मुंबईलाही उद्या पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात पुन्हा एकदा धो-धो पावसाला सुरुवात झाली आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ातील जिह्यांनाही पावसाचा तडाखा बसला आहे. कोकण किनारपट्टी परिसरात अतिवृष्टी सुरू असल्याने अनेक तालुक्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गही पाण्याखाली गेला असून अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे या महामार्गावरील वाहतूक ठिकठिकाणी खोळंबली आहे.
मुंबईत सलग दुसऱया दिवशी मुसळधार पाऊस कोसळला. रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने काही भागांत पाणी साचले होते. सलग सुट्टय़ांचा आनंद लुटण्याचे प्लॅनिंग केलेल्या मुंबईकरांची मुसळधार पावसाने निराशा केली. धो-धो पावसामुळे दिवसादेखील दृश्यमानता कमी झाली. त्याचा रस्ते, रेल्वे व विमान वाहतुकीवर परिणाम झाला. पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली. पावसाने सर्व बाजूंनी कोंडी केल्यामुळे मुंबईकरांची सुट्टी पाण्यात गेली. शहरात 21 ऑगस्टपर्यंत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
जळगावमध्ये ढगफुटी, नांदेडलाही पुराचा वेढा
कोकणासह विदर्भ, मराठवाडय़ातही पावसाने दाणादाण उडवली आहे. या भागातील शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जळगावच्या काही भागांत ढगफुटीसारखा अतिमुसळधार पाऊस कोसळला. अनेक गावांना पावसाचा तडाखा बसला. धरणगाव येथील धरणी नाल्याला मोठा पूर आल्याने सुरक्षा कठडे तुटले आणि परिसरातील घरे व दुकानांमध्ये पाणी शिरले. नांदेड जिह्यामध्येही कित्येक गावांना पुराच्या पाण्याने वेढले आहे. धाराशीवमध्ये तेरणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे.
रत्नागिरी जिल्हय़ात बाजारपेठांमध्ये शिरले पाणी
रत्नागिरी जिल्हय़ात चिपळूण, खेड आदी महत्त्वाच्या बाजारपेठांना तळ्याचे स्वरूप आले आहे. खेडला जगबुडी नदीच्या पाण्याचा धोका वाढल्याने प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. संगमेश्वरमध्ये गडनदीचे पाणी माखजन बाजारपेठेत शिरले आहे. नद्यांलगतच्या अनेक गावांतील जनजीवन ठप्प झाले आहे. गणपती सण काही दिवसांवर आला असतानाच पावसाने हाहाकार उडवल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.