
यंदा तापमानवाढीचे वर्ष असल्याने उकाड्याने सर्वजण त्रासले आहेत. यंदा मॉन्सूनही विलंबाने दाखल झाला आहे. केरळमध्ये मॉन्सून 7 जूनला दाखल झाला. आता मॉन्सूनने आगेकूच केली असून रविवारी मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाने आगमनाची आनंदवार्ता दिली आहे. आता दोन दिवसात मॉन्सून महाराष्ट्र व्यापणार असल्याने उकाड्यापासून सुटका होणार आहे. मॉन्सूनच्या पुढच्या प्रवासासाठी वातावरण पोषक असून तो येत्या ४८ तासांत संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
सिंधुदुर्ग, गोवा, रत्नागिरी व कोल्हापूरचा काही भाग मान्सूनने व्यापला आहे. रत्नागिरी, शिवमोगा, हासन, धर्मपुरी, श्रीहरीकोटा, धुबरी येथून मान्सूनचा प्रवास सुरू झाला आहे. येत्या दोन दिवसात महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. येत्या 48 तासांत मान्सून अरबी समुद्राचा काही भाग, कर्नाटक आणि महाराष्ट्राचा काही भाग, तामिळनाडूचा उर्वरित भाग, आंध्र प्रदेशचा काही भाग, दक्षिण मध्य आणि वायव्य बंगालचा उपसागर, ईशान्य भागातील काही राज्य, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि बिहार राज्यात मजल मारण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

























































