Monsoon Rain Prediction यंदा मत्त आणि मस्त पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही आनंदधारा बरसणार असून 99 टक्के मान्सून होणार आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत मध्य आणि उत्तर हिंदुस्थानासह हिमालयात मुसळधार तर पूर्व, उत्तर पश्चिम आणि दक्षिण हिंदुस्थानातील काही भागांत त्या तुलनेत कमी पाऊस पडणार आहे. विशेष म्हणजे देशभरात मान्सूनचा समान पॅटर्न असणार असून सरासरी 87 सेंटिमीटर पाऊस पडणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

1971 ते 2022 पर्यंत सरासरी 868.6 मिमी पाऊस तर 1961-2010 पर्यंत मिळालेल्या माहितीच्या आधारे 880.6 मिमी सरासरी पाऊस झाला आहे. त्यामुळे प्रत्येक दशकात सुमारे 12 सेंटिमीटरने पाऊस कमी झाला आहे, असेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. दरम्यान, हवामान खाते पुन्हा मे महिन्याच्या अखेरीला पावसाचा अंदाज व्यक्त करणार आहे.

सलग चार वर्षे चांगला पाऊस

देशात 2019 ते 2021 अशी तीन वर्षे चांगला पाऊस झाला आहे तर आताच्या 2022 वर्षी चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे देशात सलग चार वर्षे चांगला पाऊस पडणार आहे. 2019 मध्ये 99 टक्के तर 2020 आणि 2021 मध्येही त्यापेक्षा थोडा जास्त पाऊस पडला तर या वर्षीही 99 टक्के म्हणजे चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

ला-नीनाचा धोका

देशात चांगला पाऊस पडणार असला तरी सध्या प्रशांत महासागरात ला नीना हे चक्रीवादळ घोंघावत आहे. हे चक्रीवादळ पावसाळ्यापर्यंत अस्तित्वात राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी स्काईमेट या खासगी हवामान संस्थेनेही देशात या वर्षी 98 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला होता.