
मान्सून सहा दिवस आधीच अंदमानात पोहोचल्याने महाराष्ट्रातही तो लवकरच दाखल होणार आहे. पण दरम्यान वातावरणात झालेल्या बदलामुळे पुढील तीन-चार दिवसांत राज्याच्या विविध भागांत गडगडाटासह पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान तज्ञांच्या अंदाजानुसार 21 मेपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातील काही ठिकाणी पाऊस होईल. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी याच कालावधीत उष्णतेची लाटही येण्याची शक्यता आहे. उद्या गुरुवारी सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव येथे विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल असा अंदाज आहे. अरबी समुद्राच्या आग्नेयेला ताशी 60 किलोमीटर वेगाने वारे वाहतील असाही कयास हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे. आज धाराशीव, सातारा, सांगली, कोल्हापूरमधील अनेक भागांत सोसाटय़ाच्या वाऱयासह पाऊस झाला.




























































