
आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर कमी होताना दिसत नाही. त्याचा परिणाम अमेरिकेच्या क्रेडीट रेटींगवर दिसून येतोय. जागतिक रेटिंग एजन्सी ‘मूडीज’ने अमेरिकेचे रेटिंग कमी केले. ‘मूडीज’ने अमेरिकेचे गोल्ट स्टँडर्ड रेटिंग ‘एएए’ वरून ‘एए1’ केले. केवळ ‘मूडीज’ या एकाच प्रतिष्ठीत एजन्सीने नव्हे तर अन्य दोन एजन्सींनीदेखील अमेरिकन सरकारचे क्रेडीट कमी केले. स्टँडर्ड अँड प्युअर्सने (एस अँड पी) 2011 साली तर फिच रेटींग्जने 2023 मध्ये अमेरिकेला रेटींग कमी दिले होते.
अमेरिकेची आर्थिक ताकद मजबूत असली तरी वित्तीय तूट भरून काढणे आव्हानात्मक ठरेल, असा अंदाज ‘मूडीज’ने वर्तवला आहे. कर्जावरील वाढते व्याज, विविध कल्याणकारी योजनांवरील खर्च तसेच महसूलात घट यामुळे 2035 पर्यंत अमेरिकेचे बजेट नुकसानीचे प्रमाण सुमारे 9 टक्के पोचेल, जे 2024 मध्ये 6.4 टक्के होते. अमेरिकेच्या खासदारांनी शुक्रवारी वॉशिंग्टन येथे कर आणि खर्च विधेयकासंदर्भात काही हालचाली केल्या. अमेरिकेतील रिपब्लिकन पार्टी करकपातीच्या विरोधात आहे तर डेमोक्रेटीक पार्टी खर्चाच्या कपातीसाठी तयार नाही.