शुक्रवारी छायाकल्प चंद्रग्रहण

676

नववर्षातील पहिले छायाकल्प चंद्रग्रहण येत्या 10 जानेवारी रोजी पौष शाकंभरी पौर्णिमेच्या रात्री होणार असून ते संपूर्ण हिंदुस्थानातून दिसणार असल्याचे खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. याविषयी  सोमण म्हणाले की, ज्यावेळी चंद्रबिंब पृथ्वीच्या दाट छायेभोवती असणाऱया विरळ छायेमध्ये येते त्यावेळी छायाकल्प म्हणजेच मांद्य चंद्रग्रहण दिसते. शुक्रवारी रात्री 10.38 वाजता चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेमध्ये येण्यास प्रारंभ होईल. रात्री 12.40 वाजता जास्तीत जास्त म्हणजे 89 टक्के चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेमध्ये येईल. उत्तरात्री 2.42 वाजता संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेतून बाहेर पडेल. हे चंद्रग्रहण साध्या डोळय़ांनी पाहता येईल. पौर्णिमा असूनही ग्रहणात चंद्रबिंब कमी तेजस्वी दिसेल. हे छायाकल्प चंद्रग्रहण उत्तर अमेरिकेचा उत्तर पश्चिम भाग, आशिया, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि दक्षिण अमेरिकेचा पूर्व भाग येथून दिसेल असेही सोमण यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या