
सामना ऑनलाईन,मुंबई
मध्य रेल्वेच्या तीन टर्मिनससह एकूण सहा स्थानकांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचा निर्णय रेल्वे सुरक्षा बलाने घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस यासह सहा स्थानकांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्ताव तयार करण्यात आला असून वर्षभरात हे बदल करण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गांवर 78 स्थानके असून 43 लाख प्रवासी दररोज प्रवास करीत असतात. मध्य रेल्वेवर दररोज 1772 लोकल फेऱ्या चालवण्यात येतात. जागोजागी पादचारी पूल आणि सरकते जिने यांचे काम चालू असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांच्या मदतीला महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचे जवानही तैनात केले आहेत. 26 नोव्हेंबरच्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर मध्य रेल्वेच्या महत्त्वाच्या स्थानकांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करीत ‘इंटिग्रेटेड सिक्युरिटी सिस्टम’ योजनेअंतर्गत सीसीटीव्हींचे जाळे विणण्यात आले. सीएसएमटी, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस व ठाणे येथे ही योजना राबवण्यात आली. यात बॅग स्कॅनर, अंडर व्हेईकल स्कॅनर, मेटल डिटेक्टर डोअर फ्रेम, हॅण्ड हेल्ड मेटल डिटेक्टर, डॉग्ज स्क्वॉडच्या संख्येत वाढ करण्यात आली.
मध्य रेल्वेवरील पाच उपनगरीय स्थानकांच्या सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. प्रस्ताव मध्य रेल्वेच्या मुख्यालयालाही पाठवला आहे. एक वर्षभरात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोठे बदल करण्यात येतील- अश्रफ के. के., वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे



























































