पुण्यात दिवसाला हरवतायेत 65 मोबाईल, मोबाईल सापडण्याचे प्रमाण कमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मीडियाच्या जमान्यात नवनवीन फिचर्स असलेले मोबाईल वापरण्यात पुणेकर आघाडीवर आहेत. मात्र, कामाच्या गडबडीत अनेकांकडून मोबाईल हरविल्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पोलिसांच्या ‘लॉस्ट अ‍ॅड फाऊंड’ वेबसाइटवर आठ महिन्यात 13 हजार 800 मोबाईल हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यामध्ये दररोज 65 मोबाईल गहाळ होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. त्यापैकी फक्त 212मोबाईल परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले आहे.

वस्तू हरविल्याची तक्रार देण्यासाठी नागरिकांना पोलीस ठाण्यात हेलपाटे मारावे लागत होते.  त्या पार्श्वभूमीवर काही वर्षांपुर्वी पुणे पोलीस आयुक्तालयाच्यावतीने लॉस्ट एँड फाऊंड ऑनलाईन तक्रार नोंदविण्याची सुविधा सुरू केली होती. त्यानुसार नागरिकांना ऑनलाईन वस्तू हरविल्याची तक्रार देण्याची सोय करण्यात आली. सुविधा सुरू झाल्यानंतर नागरिकांना त्याचा फायदा झाला आहे. मात्र, दिवसेंदिवस मोबाईल हरविण्याचे प्रमाण वाढल्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे पुणे पोलिसांच्या वेबसाईटवर लॉस्ट अ‍ॅण्ड फाउंडमध्ये तक्रारींचा पाउस पडत आहे. गुन्ह्याच्या तपासाबरोबर मोबाईलचा शोधही पोलिसांचा घ्यावा लागत आहे.

पुणे पोलीस आयुक्तालयात मागील आठ महिन्यांत  लॉस्ट अ‍ॅन्ड फाऊंडवर 63 हजार 113 तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत.  त्यापैकी तब्बल 13 हजार 800 तक्रारी  मोबाईल हरवल्याचे  दिसून आले आहे. त्यानुसार शहरात दिवसाला  6५ मोबाईल हरविल्याच्या तक्रारी  नोंद होत आहेत. सर्व मोबाईल हरवल्याची माहिती मागवून त्याचा माग काढण्यासाठी पोलिसांकडून प्राधान्य देण्यात येत आहे.  दरम्यान सर्वाधिक मोबाइल हरविल्याच्या तक्रारी हडपसर पोलीस ठाण्यातंर्गत  नोंदविण्यात आल्या आहेत.  तब्बल  1 हजार 816 मोबाईल हरवलेल्या तक्रारी हडपसरमध्ये आहेत.   भारती विद्यापीठ 1 हजार 64, सिंहगड रोड 960, कोंढवा पोलीस ठाण्यातंर्गत 906  मोबाईल हरविल्याच्या तक्रारी  नोंदविण्यात आल्या आहेत.

वादावादी टाळण्यासाठी तक्रारीला खो

मोबाईल चोरीला गेल्यानंतर नागरिकांकडून  पोलीस ठाण्यात धाव घेतली जाते. मात्र, ऑनलाईन तक्रार देण्यासंदर्भात होणार्‍या पोलिसांच्या वादावादी टाळण्यासाठी अनेकांकडून खो दिला जातो. त्यानंतर मात्र,  मोबाईल चोरटा सापडल्यावर पोलिसांना तक्रारदार शोधण्याची वेळ आल्याचे अनेक घटनांवरून दिसून आले आहे. दरम्यान, प्रवास आणि कामाच्या गडबडीत मोबाईल गहाळ होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे मनस्तापापासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी  मोबाईल सांभाळवे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.