
सामना ऑनलाईन, काठमांडू
मुसळधार पाऊस आणि खराब हवामानामुळे कैलास मानसरोवर यात्रेला गेलेले १५०० हिंदुस्थानी भाविक नेपाळमध्ये अडकले आहेत. यात्रेकरूंना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून १५० जणांची सिमीकोटमधून सुटका केली आहे. दोन भाविकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. सिमीकोटमध्ये ५२५ यात्रेकरू, हिल्सा येथे ५५० आणि तिबेटजवळ ५०० यात्रेकरू अडकले आहेत.भाविकांना सुरक्षितपणे सिमीकोट आणि हिल्सा येथून हलविण्यासाठी सात प्रवासी विमाने तैनात केली आहेत. तसेच नेपाळ लष्कराच्या हेलिकॉप्टर्सचीही मदत घेण्यात येत आहे.
सुटकेसाठी तीन दिवस लागणार
सिमीकोट आणि हिल्सा येथे अडकलेल्या यात्रेकरूंच्या सुटकेसाठी तीन ते चार दिवस लागतील, असे हिंदुस्थानी दूतावासाच्या अधिकाऱयाने सांगितले. दूतावासाने सिमीकोट, हिल्सा, तिबेट येथे अधिकाऱ्याचे पथक पाठविले आहे.
हिंदुस्थानी भाविकांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दूतावासाकडून पर्यटकांच्या जेवणाची आणि राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्येष्ठांच्या आरोग्य तपासणीसाठी व्यवस्था केली आहे.
सुषमा स्वराज, परराष्ट्रमंत्री
रेस्क्यू ऑपरेशन सुरू
यात्रेकरूंना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे, मात्र मुसळधार पाऊस आणि खराब हवामानामुळे अडथळे येत आहेत.
केरळच्या लीला नारायणन मंद्रेदाथ आणि अंध्रातील सत्या लक्ष्मी या दोन महिला भाविकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
हिंदुस्थानी दूतावासाने भाविक आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी वेगवेगळय़ा भाषेतील हॉटलाइन क्रमांक सुरू केले आहेत.
टूर ऑपरेटर्सनी यात्रेकरूंना तिबेटकडेच थांबवावे. नेपाळच्या दिशेने असणाऱ्या मार्गावर वैद्यकीय आणि नागरी सुविधा कमी असल्यामुळे दूतावासाने या सूचना केल्या आहेत.




























































