परभणीत टाळेबंदीत सतराशेहून अधिक वाहने जप्त,  दंडात्मक कारवाई सुरू

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या टाळेबंदीच्या काळात विनाकारण सतराशेहून अधिक फिरणाऱ्यांची वाहने परभणी वाहतूक शाखेकडून जप्त करण्यात आली आहेत. आता जिल्ह्यात विविध ठिकाणी बॅरिकेट्स लावून दंडात्मक कारवाई सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी दिली आहे.

कोरोनाच्या विषाणूंच्या पार्श्‍वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार परभणी जिल्ह्यात रस्त्यावर कोणीही विनाकारण फिरू नये, असे आवाहन वारंवार पोलीस प्रशासनाकडून करण्यात येते. तरी देखील अनेकजण आपली वाहने घेऊन रस्त्यावर विनाकारण फिरताना आढळून येत असल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. या अंतर्गत आतापर्यंत तब्बल 1 हजार 700 हुन अधिक दुचाकी आणि चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. मात्र, आता गेल्या दोन दिवसांपासून दंडात्मक कारवाई करण्यात आली.

कारवाई करूनही  लोकांमध्ये फरक जाणवत नसल्याने गेल्या दोन दिवसांपासून वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या अंतर्गत दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात 88 हजार रुपयांचा दंड वाहनचालकांकडून वसूल करण्यात आला आहे, तर वाहतूक शाखेने परभणी शहरात 33 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही कारवाई सुरूच असून वाहनधारकांची कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. कारवाईमध्ये सर्वाधिक आकडा विनाकारण फिरणाऱ्यांचा आहे. दंडात्मक कारवाईमुळे लोकांवर वचक बसेल आणि ते घरातच राहून कोरोनाचा सामना करतील, अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या