
कल्याण पूर्व भागात महापालिका प्रशासनाने विशेष साफसफाई मोहीम राबवून 335 टन कचरा उचलला. त्यामुळे या भागातील नागरिकांची दुर्गंधीच्या जाचातून सुटका झाली आहे. महापालिकेच्या गलथान कारभारामुळे या भागात मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. याबाबत दैनिक ‘सामना’ने आवाज उठवल्यानंतर पालिका प्रशासनाची एकच पळापळ उडाली. घनकचरा विभागाने या भागात रात्री सफाई मोहीम राबवून सर्व कचरा उचलून नेला.
कल्याण पूर्व भागात राबविण्यात आलेली ही विशेष मोहीम महापालिका आयुक्त अभिनव गोयल, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील आणि ‘ड’ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. ही मोहीम सुमित एल्कोप्लास्ट या कंपनीमार्फतच राबविण्यात आली. रात्रीच्या सत्रात अधिक प्रभावीपणे काम पार पाडण्यासाठी यंत्रणा, मनुष्यबळ आणि नियोजन यांचा उत्तम समन्वय साधण्यात आला होता. या विशेष उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता वाढली आहे. अनेक रहिवाशांनी या मोहिमेचे स्वागत करत महापालिकेचे आभार मानले आहेत. ‘ड’ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांनी दिलेल्या माहितीनुसार नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद व कर्मचारीवर्गाच्या मेहनतीमुळे हा परिसर आता अधिक स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी झाला आहे.