
मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठीच्या माध्यम हक्कांचा लिलाव संपला. हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी मंगळवारी ट्विट करून याबाबत अधिकृत माहिती जाहीर केली. या आयपीएल माध्यम हक्कांच्या लिलावातून ‘बीसीसीआय’ चांगलीच मालामाल झाली आहे.
2023 ते 2027 या काळात आयपीएलचे टीव्ही प्रक्षेपण हक्क स्टार वाहिनीकडे, तर डिजिटल राइट्स वायकॉमकडे (रिलायन्स) देण्यात आले आहेत. पाच वर्षांसाठीच्या एकूण चार पॅकेजेससाठी बीसीसीआयला या लिलावातून तब्बल 48 हजार 390 कोटी रुपयांची गंगाजळी मिळाली आहे.
जय शाह यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘वायकॉम-18ने 23 हजार 775 कोटी रुपयांना डिजिटल हक्क विकत घेतले आहेत. वायकॉम-18ने ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि युनायटेड किंगडममधील प्रसारणाचेही हक्क विकत घेतल्याची माहिती जय शाह यांनी दिली. टाइम्स इंटरनेटने मध्यपूर्व आणि अमेरिकेतील सर्व हक्क विकत घेतले आहेत. टाइम्सकडे इतर देशांचेही हक्क असतील, अशी माहिती बीसीसीआय सचिवांनी दिली आहे.
चार पॅकेजचे वर्गीकरण
- डिस्नी स्टारने हिंदुस्थानी उपखंडातील टीव्ही प्रक्षेपण हक्क 23,575 कोटी रुपयांना विकत घेतले.
- वायकॉम-18ने हिंदुस्थानी उपखंडातील डिजिटल राइट्ससाठी 20,500 कोटी रुपये मोजले.
- निवडक 98 सामन्यांचे नॉन एक्सक्लुझिव डिजिटल राइट्सही वायकॉम-18ने 3,258 कोटी रुपयांना खरेदी केले.
- हिंदुस्थानी उपखंडाबाहेरील टीव्ही आणि डिजिटल राइट्सदेखील वायकॉम-18ने 1057 कोटी रुपयांना मिळविले.
पाच वर्षांत आयपीएलच्या 410 लढती खेळवणार
बीसीसीआयने येत्या 5 वर्षांत आयपीएलच्या 410 लढती खेळवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. त्यामुळे प्रसारक कंपन्यांनी लढतीच्या प्रक्षेपण हक्कांसाठी अधिकाधिक रक्कम मोजण्याची तयारी यंदा लिलावात दाखवल्याचे स्पष्ट झाले. 2023-24मध्ये 74-74 लढती खेळवण्याचे ठरले आहे. त्यानंतर 2025 आणि 2026मध्ये या लढतीची संख्या वाढवण्यात येणार आहे. या दोन वर्षांत प्रत्येक वर्षाला 84 लढती खेळवण्यात येतील. तर 2027मध्ये 94 आयपीएल लढती खेळलेल्या जातील, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
जगातील 5 महागड्या क्रीडा लीगचे प्रसारण हक्क
लीगचे नाव खेळ प्रतिलढत प्रसारण हक्क (रुपयांत)
एनएफएल (अमेरिका) फुटबॉल 113 कोटी रुपये
आयपीएल (हिंदुस्थान) क्रिकेट 118कोटी रुपये
ईपीएल (इंग्लंड) फुटबॉल 86 कोटी रुपये
एमएलबी (अमेरिका) बेसबॉल 86 कोटी रुपये
एनबीए (अमेरिका) बास्केटबॉल 15.6 कोटी रुपये



























































