1 कोटी 75 लाख उद्योग बंद पडणार! बेरोजगारीचा आणखी स्फोट होणार

1382

कोरोना महामारीमुळे निचांकी गेलेल्या अर्थव्यवस्थेचा मोठा फटका सूक्ष्म, लघु उद्योग आणि लहान व्यापाऱ्य़ांना बसला आहे. देशातील तब्बल 1 कोटी 75 लाख हे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे बेरोजगारीचा आणखी स्फोट होण्याची भीती आहे. हे आमच्यासमोरील शतकातील सर्वात मोठे संकट असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहान उद्योगांना सावरण्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (सीएआयटी) केली आहे.

कोरोना रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील कोट्यवधी सूक्ष्म-लघु उद्योग आणि लहान व्यापाऱ्य़ांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कोट्यवधी उद्योग, व्यवसाय अडचणीत आले आहेत. यातील 25 टक्के उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर असून ही संख्या 1कोटी 75 लाख इतकी प्रचंड आहे.

पंतप्रधान मोदी गप्प का?

आधीच 12 कोटी नोकऱ्य़ा गेल्या आहेत. त्यातच आता 1.75 कोटी लहान उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. यातील अर्धे उद्योग जरी बंद पडले, तरी 20 कोटीहून अधिक लोकांची रोजीरोटी जाईल. पंतप्रधान मोदी गप्प का आहेत? असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. मीडियातील सहकाऱ्य़ांनीही फिल्मी नटीतून वेळ मिळाला की, मोदी सरकारला देशाविषयी प्रश्न विचारवेत, असा सणसणीत टोलाही सुरजेवाला यांनी लगावला आहे.

काय आहे स्थिती

  • सूक्ष्म-लघु उद्योग, लहान व्यापारी हे अर्थव्यवस्थेचा महत्वाचा भाग आहे. मात्र कोरोनामुळे या उद्योगावर शतकातील मोठे संकट आल्याचे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने म्हटले आहे.
  • देशात सात कोटी लहान उद्योग-व्यापारी आहेत. 40 कोटी लोकांना येथून रोजगार मिळतो.
  • केवळ सात टक्के लहान उद्योगांना बँका कर्ज देतात. इतर 93 टक्के उद्योग-व्यापारी उसने पैसे, खासगी व्याजाने कर्ज घेतात.
  • व्यवसाय आर्थिक संकटात असताना खर्च कमी झालेला नाही. सरकारी कर, कर्जाचे हफ्ते, कामगारांचा पगार, भाडे, वीज बिल याचा बोजा आहे.
  • हे उद्योग-व्यवसाय वाचविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅकेज जाहीर करावे.
आपली प्रतिक्रिया द्या