मुंबई, रायगड व पुण्यात जुलैमध्ये तीन हजार सुरक्षा रक्षकांची भरती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

राज्यात पुणे, रायगड, बृहन्मुंबई-ठाणे या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात भरती सुरू झाली आहे. सुमारे तीन हजार सुरक्षा रक्षकांची भरती प्रक्रिया जुलैअखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती कामगारमंत्री डॉ. संजय कुटे यांनी दिली. दरम्यान, सुरक्षा रक्षकांचे वेतन नियमितपणे आणि वेळेत अदा करावे त्यासाठी आवश्यकता भासल्यास ‘सुरक्षा रक्षक गार्ड मंडळा’कडे जमा असलेल्या निधीतून सुरक्षा रक्षकाच्या वेतनाच्या 80 टक्के वेतन त्यांना दरमहा अदा करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.

महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक सल्लागार समितीची बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना डॉ. कुटे म्हणाले की, सुरक्षा रक्षकांची भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी ऑनलाइन भरतीस मोठय़ा प्रमाणात चालना देण्यात आली आहे. सर्व आस्थापनांवरच्या सुरक्षा रक्षकांना आकर्षक व प्रभावी असा गणवेश देण्यात यावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या. त्याचबरोबर सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण देणे, त्यांना आवश्यक ती साधने उपलब्ध करून देणे. दरवर्षी त्यांची शारीरिक क्षमता चाचणी घेणे याबाबत संबंधित अधिकाऱयांना आदेश देण्यात आले.

यावेळी कामगार विभागाचे राज्यमंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे, प्रधान सचिव राजेश कुमार, कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, उपसचिव डॉ. श्रीकांत पुलकुंडवार, प्रभारी सह आयुक्त कामगार (माथाडी) रविराज इंळवे, महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक सल्लागार समितीचे सदस्य पराग अळवणी, कामगार प्रतिनिधी तसेच आदी अधिकारी उपस्थित होते.