
सामना प्रतिनिधी, मुंबई
गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेचे सुमारे 90 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले असून गेल्या दोन महिन्यांत राज्यात 2 कोटी 70 लाख बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे. ग्रामीण भागात सुमारे 22 जिह्यांमध्ये 90 टक्क्यांहून अधिक बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे अशी माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
सांगली, पुणे, धाराशीव या जिह्यांतील ग्रामीण भागात 100 टक्क्यांहून अधिक लसीकरण झाले असून वाशीम, चंद्रपूर, अमरावती, ठाणे, परभणी, जळगाव, नंदुरबार, पालघर, गडचिरोली, नागपूर, सोलापूर, संभाजीनगर, नगर, नांदेड, हिंगोली, वर्धा, नाशिक, लातूर, भंडारा आणि धुळे या जिह्यांतील ग्रामीण भागातील 90 टक्क्यांहून अधिक बालकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. गोवर-रुबेला या गंभीर आजारांचे निर्मूलन करण्यासाठी राज्यात 9 महिने ते 15 वर्षांखालील बालकांसाठी 27 नोव्हेंबरपासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. गेले दोन महिने ही मोहीम सर्व शाळांमध्ये राबविण्यात आली.



























































