
सामना ऑनलाईन । मुंबई
जोडीदाराचा शोध घेण्यासाठी शादी डॉट कॉम या विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळांवर नोंदणी करताना आपला फोटो अपलोड करणे धोकादायक ठरू लागले आहे. विवाह जुळवणाऱ्या या अग्रगण्य संकेतस्थळावरील तरुण-तरुणींचे फोटो मार्फिंग करून ते यू-टय़ूबवर अपलोड केल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ताडदेव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शादी डॉट कॉम या संकेतस्थळाच्या माध्यमातून विवाह जुळवून देण्याचे काम केले जाते. मात्र जे तरुण-तरुणी आपला जोडीदार शोधत असतात त्यांना संकेतस्थळावर फी भरून नोंदणी करावी लागते. नोंदणी झाल्यानंतर संबंधितांना इतरांचे प्रोफाईल, मोबाईल नंबर, फोटो वगैरे पाहता येतात. फोटो पाहता यावा यासाठी संबंधितांकडून संकेतस्थळावर त्यांचा फोटो अपलोड केला जातो. संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या तरुण-तरुणींची माहिती चोरी करून त्या माहितीच्या आधारे यू-टय़ूबवर अनेक व्हिडिओ बनवण्यात आले. पण गंभीर म्हणजे अनेक तरुणींचे फोटो मॉर्फिग करून अश्लील बनविण्यात आले आहेत. हा प्रकार समोर येताच सदस्यांच्या तक्रारीनंतर संकेतस्थळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ताडदेव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकाराबाबत यू-टय़ूब आणि पोलिसांना माहिती दिली असून हे गैरकृत्य करणाऱ्याला पकडून शिक्षा झाली पाहिजे, असे अधिकाऱयांचे म्हणणे आहे.

























































