मोशीतील पाच युवकांसह आठ जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह, आजपर्यंत 153  जणांना कोरोनाची लागण

1027

पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी संजय गांधीनगर परिसरातील पाच युवकांसह आठ जणांचे आज (बुधवारी)  रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामध्ये पाच युवक, एक पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे.  यामुळे कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचा आकडा 72 वर पोहचला आहे. तर, शहरातील 143 आणि महापालिका हद्दीबाहेरील दहा अशा 153 जणांना आजर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. तर, 55 जण कोरोनामुक्त झाले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

महापालिकेने मंगळवारी (दि. 5) 204 कोरोना संशयितांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्ही आणि ‘नारी’कडे पाठविले होते. त्याचे काही रिपोर्ट आले आहेत. मोशी संजय गांधीनगर परिसरातील आठ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.  त्यामध्ये 21, 23, 24, 25, 28 वर्षीय युवक आणि एका 50 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर, 28 आणि 50 वर्षीय दोन महिलांचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यातील सात जणांवर भोसरीतील रुग्णालयात तर एकावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, 10 मार्चपासून पिंपरी-चिंचवड शहरातील आणि शहराबाहेरील पण शहरात उपचार सुरू आहेत अशा 153  जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 55 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. महापालिका रुग्णालयात कोरोना बाधित सक्रिय 72 रुग्णांवर आणि शहरातील 11 रुग्णांवर महापालिका क्षेत्राबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याशिवाय पुणे जिल्ह्याबाहेरील दोन रुग्णांवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

तर, 12 एप्रिल रोजी थेरगाव भागातील एका पुरुषाचा, 20 एप्रिल रोजी निगडीतील एका महिलेचा आणि पुण्यातील रहिवाशी पण वायसीएममध्ये दाखल असलेल्या एका महिलेचा आणि  24 एप्रिल रोजी  निगडीतील एका पुरुष रुग्णाचा, 29 एप्रिल रोजी खडकीतील एका महिलेचा वायसीएम रुग्णालयात अशा पाच जणांचा कोरोनामुळे आजपर्यंत मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या