तीन जिल्ह्यातील ‘वॉन्टेड’ फलटणचा अट्टल गुन्हेगार अखेर जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सातारा

सातारा, पुणे ग्रामीण, व सोलापूर ग्रामीण पोलिसांना विविध गुन्ह्यात फरार असलेला फलटण येथील ज्ञानेश्‍वर उर्फ माऊली बापू चव्हाण या अट्टल गुन्हेगारास फलटण डीवायएसपी पथकाने मंगळवारी रोजी जेरबंद केले आहे. त्यामुळे या तिनही जिल्ह्यातील अनेक गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होणार आहे. ज्ञानेश्‍वर उर्फ माऊली बापू चव्हाण (वय 22) रा. शेरे शिंदेवाडी, ता. फलटण असे या अट्टल गुन्हेगाराचे नाव असून त्याच्यावर सातारा तालुका, फलटण ग्रामीण, फलटण शहर, बारामती शहर, नातेपुते या पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये विविध प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. अनेक दिवस तो पोलिसांना गुंगारा देवून फरार होता.

फलटणचे डॅशिंग डिवायएसपी डॉ. अभिजीत पाटील यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर फलटण शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यातील जवानांचे उपविभागीय पोलीस अधिकारी पथक तयार केले होते. गेल्या महिनाभरात विविध गुन्ह्यात फरार असलेल्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळलेल्या आहेत. काल सातारा, पुणे व सोलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेला फरारी आरोपी ज्ञानेश्‍वर उर्फ माऊली चव्हाण हा कोळकी, ता. फलटण परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती डीवायएसपी पथकाला मिळाली होती. त्यानुसार डीवायएसपी डॉ. अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी सापळा रचला होता. त्यानुसार संशयित ज्ञानेश्‍वर उर्फ माऊली चव्हाण पोलीस पथकाच्या निदर्शनास आला. पोलीसांचा ट्रॅप लागल्याचे लक्षात आल्यानंतर ज्ञानेश्‍वरने त्याच्याजवळ असणार्‍या मोटरसायकलवरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलीस जवानांनी त्याचा थरारक पाठलाग करीत त्याला ताब्यात घेतले.

दरम्यान, संशयित आरोपी ज्ञानेश्‍वर उर्फ माऊलीकडून 220 सीसी ची एक पल्सर मोटरसायकल ताब्यात घेण्यात आली असून त्याने दोन जबरी चोरी, तीन दुचाकी चोरी तसेच एकाला गंभीर मारहाण केल्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्यावर याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून ज्ञानेश्‍वर उर्फ माऊलीच्या अटकेमुळे सातारा, पुणे व सोलापूर ग्रामीण हद्दीत घडलेल्या अनेक गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होणार असल्याची माहिती डीवायएसपी डॉ. अभिजीत पाटील यांनी दिली आहे.