
उत्तरप्रदेशच्या बरेली शहरातील ख्वाजा कुतुब परिसरात भाजप नेते जितेंद्र रस्तोगी यांची दादागिरी पाहायला मिळाली. परिसरात असणाऱ्या एका नाल्यावरून अनुराधा रस्तोगी या महिलेसोबत भाजपा नेत्याचा वाद सुरू झाला. काही वेळातच हा वाद इतका वाढला की भाजप नेता आणि महिलेमध्ये तुंबळ हाणामारी झाली. अनुराधा रस्तोगी यांनी आरोप केला की, त्यांचा नाला अडवण्यात आला होता, त्यानंतर महिलेने हा नाला खोदला आणि याचा राग आल्याने भाजप नेत्याने महिला आणि तिच्या मुलीला घरातून ओढून जबर मारहाण केली. अनुराधा रस्तोगी यांच्या तक्रारीवरून भाजप नेते जितेंद्र रस्तोगी यांच्याविरोधात कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेशी संबंधित एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. नोएडामधील भाजप नेते श्रीकांत त्यागी यांचे प्रकरण ताजे असतानाच उत्तर प्रदेशातील बरेली मध्ये भाजप नेत्याची दादागिरी समोर आल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेविषयी प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे आरोपी भाजप नेते जितेंद्र रस्तोगी यांनी आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून आपण कोणावरही हल्ला केला नसल्याचे म्हटले आहे.

























































