ट्रक्टरच्या धडकेने संरक्षक भिंत कोसळली, मायलेकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी । नाशिक

उंटवाडी रस्त्यावरील सार्वजनिक बांधकाम विभागाची संरक्षक भिंत सोमवारी सायंकाळी ट्रक्टरची धडक बसल्याने कोसळली. त्याखाली दबल्याने मायलेकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

उंटवाडी रस्त्यावरील सार्वजनिक बांधकाम विभाग इमारतीच्या पाठीमागील दगडी संरक्षक भिंतीजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये रमेश सरकटे यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. सोमवारी सायंकाळी रमेश सरकटे यांची पत्नी सत्यभामा (45) व मुलगा प्रकाश (18) हे दोघेजण घरात असताना अचानक संरक्षक भिंत कोसळली. त्याखाली दबले गेल्याने प्रकाशचा जागीच, तर सत्यभामा यांचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या भिंतीलगत खड्डे खोदले असून, त्यात मुरूम टाकण्याचे काम सुरू आहे. सोमवारी सायंकाळी हे काम सुरू असतानाच मुरूम टाकणारा ट्रक्टर त्या खड्डय़ात अडकून उलटला व संरक्षक भिंतीवर आदळला. त्यामुळे भिंत कोसळून ही दुर्घटना घडल्याची माहिती मुंबई नाका पोलिसांनी दिली.

रमेश सरकटे यांचे भाऊ गणेश शंकर सरकटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक्टरचालक संतोष कडुबा निकम (30) व गंगापूर येथील नामदेव दौलत भगत यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण शिंदे करीत आहेत.