आयआयटीच्या संशोधकांनी बनवली इकोफ्रेंडली ‘मोबाईल शवदाहिनी’

कोरोनामुळे देशात रोज हजारो नागरिक दगावत आहेत. दिल्ली, गुजरातसारख्या काही राज्यांमध्ये तर कोरोनाग्रस्त मृतांवर अंत्यसंस्कारांसाठी रांगा लागल्या आहेत. स्मशानभूमींवरील ताण त्यामुळे बराच वाढला आहे. आयआयटीच्या संशोधकांनी तो कमी करण्यासाठी एक प्रयत्न केला आहे. त्यांनी इकोफ्रेंडली ‘मोबाईल शवदाहिनी’ बनवली आहे. कमीत कमी लाकडांचा वापर करून त्यामध्ये अंत्यसंस्कार करता येऊ शकतात. त्यात धूरही कमी होतो आणि ही शवदाहिनी कुठेही वाहून नेता येऊ शकते.

पंजाबमधील आयआयटी रोपरमधील संशोधकांनी चिमा बॉईलर्स या कंपनीच्या सहकार्याने ही मोबाईल शवदाहिनी बनवली आहे. ग्रामीण भागात वातीचा स्टोव्ह वापरला जातो. त्याच आधारे या शवदाहिनीची रचना केली गेली आहे. ही शवदाहिनी गॅसवर चालू केली जाते. स्टेनलेस स्टीलचे इन्सुलेशन असल्याने त्यातील ऊर्जा वाया जात नाही. शवदाहिनीत गरम हवेचीही यंत्रणा आहे. त्याचप्रमाणे शवदाहिनीच्या खालच्या बाजूला स्टीलचा ट्रे लावला गेला आहे. अंत्यसंस्कारानंतर राख त्यामध्ये जमा होऊन राहते.

एलपीजी गॅस सिलिंडरवरही पेटवता येणार

या शवदाहिनीत लावण्यात आलेले इन्सिनरेटर 1044 डिग्री सेल्सियस तापमान निर्माण करते. त्यामुळे दहन प्रक्रिया वेगाने होते. ही शवदाहिनी कार्यान्वित करण्यासाठी एलपीजी गॅस सिलिंडरचाही वापर केला जाऊ शकतो. एका मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी जितकी लाकडे लागतात त्यातील अर्ध्याहून कमी लाकडे या शवदाहिनीत अंत्यसंस्कारासाठी लागतात.

गंगेत मृतदेह सोडण्याचे प्रकार रोखता येणार

गंगेच्या किनारी असलेल्या काही घाटांजवळ अंत्यसंस्कार केले जातात. गरीबांना अंत्यसंस्कारासाठी मोठय़ा प्रमाणात लाकडे घेणे परवडत नाही. त्यामुळे थोडय़ाच लाकडांमध्ये अंत्यसंस्कार आटोपले जातात आणि नंतर अर्धवट दहन झालेले मृतदेह गंगेत प्रवाहित केले जातात. अनेकदा अंत्यसंस्काराला पैसे नसल्याने मृतदेहच नदीत सोडला जातो. ही मोबाईल शवदाहिनी असे प्रकार रोखू शकेल, असा विश्वास आयआयटी रोपरचे अधिष्ठाता हरप्रीत सिंग यांनी व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या