
जैन बोर्डिंग प्रकरण चांगलेच तापल्यानंतर मुंबईहून जाऊन आलेले खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्वतःहून जैन बोर्डिंग येथे जाऊन जैन मुनींची भेट घेतली. या भेटीत जैन समाजाला अपेक्षित असेल तो निर्णय 1 नोव्हेंबरपूर्वी होईल, असे आश्वासन मोहोळ यांनी जैन मुनी आचार्य श्री गुप्ती नंदीजी महाराज व जैन बांधवांना दिले.
मॉडेल कॉलनी येथील सुमारे तीन एकर भूखंडावर शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग व श्री 1008 भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर आहे. ट्रस्टच्या काही विश्वस्त, राजकीय नेते, बांधकाम व्यावसायिक आणि प्रशासकीय अधिकारी यांनी संगनमताने येथील जागेचा 230 कोटी रुपयांचा व्यवहार केल्याचे उजेडात आले आहे. या व्यवहारात खासदार मुरलीधर मोहोळ यांचा सहभाग असल्याचे वारंवार आरोप झाले. महायुतीतील माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचेदेखील मुरलीधर मोहळ यांच्यावर सातत्याने आरोप सुरूच होते. यानंतर जैन समाजानेदेखील रस्त्यावर उतरून आंदोलन केले. बोर्डिंगच्या जागेचा वादग्रस्त व्यवहार 1 तारखेपर्यंत रद्द न झाल्यास अमरण उपोषण व देशभर या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा आचार्य श्री गुप्ती नंदीजी महाराज यांनी दिला होता.
राजकीय किंमत मोजण्याची तयारी रवींद्र धंगेकर यांचा निर्धार
जोपर्यंत जैन मंदिर दिमाखात उभे राहत नाही आणि वसतिगृह बांधले जात नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार आहे. यासाठी राजकीय पिंमत मोजायची तयारी ठेवल्याचे मिंधे गटाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मोहोळ यांच्या मुंबईवारीवर धंगेकर म्हणाले, जैन समाजाला मुरलीधर मोहोळ यांनी त्रास दिला आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना बोलावले असेल. देवेंद्र फडणवीस हे मोहोळ यांच्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाहीत. ते जैन समाजाला न्याय देतील.




























































