
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार अरविंद सावंत यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. निवडणूक आयोग विकला गेला आहे. भाजपने संविधानाची हत्या केली असून लोकशाही पायदळी तुडवण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयापासून निवडणूक आयोगापर्यंत आणि इतर सर्व यंत्रणा सरकारच्या गुलाम झाल्या आहेत. देशात यापूर्वी असे कधीच घडले नव्हते. निवडणूक आयोगाचे निर्णय मोदी सरकार घेत आहे, अशी टीका अरविंद सावंत यांनी केली आहे.
शिवगर्जना यात्रेनिमित्त गोंदियात आले असता ते बोलत होते. सावंत पुढे म्हणाले, याआधाही अनेक राजकीय पक्षात फूट पडल्याचे आपण पाहिले आहे. त्या पक्षाचे चिन्ह गोठवण्यात आले पण दुसऱ्या गटाला देण्यात आले नाही. मात्र, येथे तर 25 लाख प्रतिज्ञापत्र आयोगाला देऊनही चिन्ह आणि नाव दुसऱ्या गटाला देण्याची किमया विकल्या गेलेल्या निवडणुक आयोगाने केली आहे. संसदेतील शिवसेनेच्या कार्यालयातून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंचे छायाचित्र काढून त्या जागी एकनाथ शिंदे, आनंद दिघे यांचे छायाचित्र लावले असल्याबाबत सावंत म्हणाले, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आम्हाला वेगळे कार्यालय दिले आहे. त्यात आम्ही हे छायाचित्र लावू.
गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील 8 गावांनी शेजारील मध्यप्रदेशात विलीनिकरणाची मागणी केली आहे. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भाची फसवणूक करत असल्याचे सिद्ध होते. फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री होते, मात्र त्यांनी आमगाव नगरपरिषदेचे भवितव्य ठरवले नाही. त्यामुळे या 8 गावांची स्थिती अनाथासारखी झाली आहे. हे फडणवीस यांचे अपयश दाखविते, असे सावंत म्हणाले.



























































