
मध्य प्रदेशमधील गुना येथे जमिनीच्या वादातून शेतकऱ्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. भाजप नेता आणि त्याच्यासोबतच्या 15-16 जणांनी रामस्वरुप नागर (वय – 40) या शेतकऱ्याला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केल. त्यानंतर अंगावर थार घालून शेतकऱ्याची हत्या केली. एवढेच नाही तर वडिलांचा जीव वाचवायला आलेल्या मुलीवर आणि पत्नीवर हात टाकत त्यांचे कपडे फाडले. फतेहगड पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या गणेशपुरा गावात हा संतापजनक प्रकार घडला.
रामस्वरुप नागर हे रविवारी सायंकाळी पत्नी विनोदबाई नागर (वय – 38) सोबत शेताकडे जात असताना भाजप नेता महेंद्र नागर आणि 15-16 गावगुंडांनी त्यांना घेरले. आरोपी महेंद्र नागर याने गुंडांसोबत मिळून आधी रामस्वरुप यांना लाथा-बुक्क्यांनी आणि काठीने बेदम मारहाण केली. रामस्वरुप यांना वाचवण्यासाठी त्यांची विनोदबाई आणि मुली कृष्णा नागर (वय – 17) आणि तनिषा नागर (वय – 17), तसेच बंधु राजेंद्र नागर यांनी धाव घेतली. मात्र त्यांनाही आरोपींनी मारहाण केली. एवढेच नाही तर त्यांना जनावराहून वाईट वागणूक दिली.
वडिलांना सोडवायला गेलेल्या मुलींसोबत गैरवर्तन करण्यात आले. आरोपी महेंद्र नागर हा मुलींच्या अंगावर बसला आणि त्याने त्यांचे कपडे फाडले. तसेच दहशत पसरवण्यासाठी हवेत गोळीबार केला आणि रामस्वरुप यांना थारखाली चिरडले. यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या रामस्वरुप यांना एक तासभर कोणतीही वैद्यकीय मदत मिळू दिली नाही. त्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
या घटनेनंतर परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली असून पोलिसांनी महेंद्र नागर आणि तीन महिलांसह 14 जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच काँग्रेस आमदार ऋषी अग्रवाल यांनी संताप व्यक्त करत आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली.
दरम्यान, भागात महेंद्र नागर याची दहशत असून त्याच्याविरुद्ध ब्र काढायला लोक घाबरतात. आरोपी गावातील छोट्या शेतकऱ्यांना भीती दाखवून त्यांच्या जमिनीवर कब्जा रत होता. गावातील अनेक शेतकरी मिळेल महेंद्र नागरकडून मिळेल त्या पैशात जमिनी विकून गाव सोडून गेले होते. जे त्याला विरोध करायचे त्यांचा शारीरिक, मानसिक छळ केला जात होता. गणेशपुरा गावातील जवळपास 25 शेतकरी आपली जमीन बाजार भावापेक्षा कमी पैशात विकून गाव सोडून गेले. मात्र रामस्वरुप यांनी महेंद्र नागरच्या गुंडगिरीला विरोध केला होता. त्यांच्या 9 ते 10 एकर जमिनीवर भाजप नेत्याचा डोळा होता आणि यातूनच त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ‘दैनिक भास्कर‘ने याबाबत वृत्त दिले आहे.



























































