इंदूर ठरले देशातील पहिले भिकारीमुक्त शहर, महिला बालकल्याण विभागाची माहिती

इंदूर शहर हे देशातील पहिले भिकारीमुक्त शहर ठरले आहे. एकेकाळी इंदोरच्या रस्त्यांवर पाच हजार भिकारी होते. आता मात्र इंदोर पहिले भिकारीमुक्त शहर बनले आहे. तेथील महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

भिकारीमुक्त शहर बनवण्यासाठी तेथील प्रशासनाने एक कॅम्पेन राबवले. तेथील भिकाऱ्यांना नोकऱ्या देण्यात आल्या तसेच भीक मागणाऱ्या लहान मुलांना शाळेत पाठवण्यात आले. पाच हजार भिकाऱ्यांपैकी पाचशे लहान मुले होती. केंद्र सरकार तसेच जागतिक बँकेने या प्रकल्पाला मदत केली असून या कॅम्पेनच्या पहिल्या टप्प्यात जनजागृती करण्यात आली. त्यानंतर त्यांचे पुनर्वसन करण्यात आले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली तर अनेक भिकारी हे राजस्थान येथून इंदूरमध्ये आल्याचेही त्यांनी सांगितले. इतकेच नव्हे तर भीक मागणे व भीक देणे किंवा त्यांच्याकडून काही खरेदी करणे यावर शहरात बंदी घालण्यात आली असून तीन गुन्हे दाखल करण्यात आल्याचे अधिकारी म्हणाले. भिकाऱ्याबाबत जो कोणी माहिती देईल त्याला एक हजार रुपयाचे इनाम जाहीर करण्यात आल्याने लोकांनी या कॅम्पेनला चांगला प्रतिसाद दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.