
‘ज्या पक्षात आम्हाला न्याय मिळतो, त्या पक्षात आम्ही जातो. आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही लगेच ‘पलटी’ मारतो, अशा शब्दांत खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी पक्ष बदलाबाबत सांगितले.
श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी बुद्रूक येथील विकास सोसायटीच्या नूतन वास्तूच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार बबन पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नाहटा, सुवर्णा पाचपुते, संदीप नागवडे, केशव मगर, हरिदास शिर्के, शंकर पाडळे, राजेंद्र म्हस्के उपस्थित होते.
डॉ. सुजय विखे म्हणाले, अण्णासाहेब शेलार हे दिवंगत बाळासाहेब विखे यांच्या सान्निध्यात वाढलेले कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांचे काम चांगले आहे. त्यांनी आधी पक्ष जाहीर करावा, नंतर निधी जाहीर करू, असेही विखे म्हणाले. ज्या पक्षात आम्हाला न्याय मिळतो, त्या पक्षात आम्ही जातो. आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही लगेच ‘पलटी’ मारतो, असे सांगत त्यांनी पक्षबदलाबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली.
अण्णासाहेब शेलार म्हणाले, भैरवनाथ सोसायटीचे 3780 सभासद आहेत. सगळ्यात जास्त कर्जवाटप या सोसायटीने केले आहे. खावटी कर्ज पुन्हा शेतकऱयांना लवकर वाटप करावे, अशी मागणी शेलार यांनी जिल्हा बँकेचे संचालक राहुल जगताप यांच्याकडे केली.



























































