
राज ठाकरे यांचं भाषण ही करमणूक असून त्याकडे मनोरंजन म्हणूनच बघावं, त्याला फारसं गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर त्या बोलत होत्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी काल माझ्या लोकसभा मतदारसंघात होते, म्हणून मी त्यांचं पूर्ण भाषण ऐकलं नाही. मला सगळं भाषण बघता आलं नाही तरी काही प्रमाणात वर्तमानपत्रातून वाचनात आलं. खरंतर आज देशासमोर राज्यासमोर खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. महागाईचं खूप मोठं आव्हान देश-राज्यासमोर आहे. यावर राजकीय पक्ष म्हणून महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलणं, त्यावर मार्ग काढणं हे लोकप्रतिनिधीचं काम आहे. त्यांच्या भाषणात अशा प्रश्नांवर किंवा नवीन पिढीच्या समस्यांवर काही भाष्य केल्याचं माझ्यातरी वाचनात आलं नाही. ते इतिहासात रमल्यासारखे वाटले, असं सुळे यावेळी म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या, दुसरी गोष्ट खटकली ती म्हणजे ज्या व्यक्तिने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना दुखावलं, त्यांच्या टीकेबद्दल मी काय बोलणार? इतिहासात रमणं चांगली गोष्ट आहे, इतिहास जरूर वाचावा. त्यात रमावं पण लोकप्रतिनिधींनी या देशाचं वास्तव, आज आणि उद्या यांवर लक्ष द्यावं. आज देशासमोर आणि राज्यासमोर काय आव्हानं आहेत? आज महागाईमुळे कसं महिलांचं कंबरडं मोडलं आहे? नवीन पिढीला नोकऱ्यांसाठी काय अडचणी येताहेत? या देशात सगळ्यात जास्त स्टार्टअप्स महाराष्ट्रात आहेत, तो उपक्रम पुढे कसा नेता येईल? पर्यटनासाठी वेगळी काय धोरणं होऊ शकतात? याकडे लक्ष देणं जास्त आवश्यक आहे. आम्ही राजकारणात एकमेकांवर टीका करण्यासाठी आलो नाहीत. आपण लोकांसाठी चांगलं काम करण्यासाठी राजकारणात आलो आहोत, असं सुळे यावेळी म्हणाल्या.
राज ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया काय देणार, या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित पवार म्हणाले तसं त्यांना वेळ आली की नक्कीच उत्तर देऊ, पण ही उत्तर द्यायची वेळ नाही. आज देशासमोर राज्यासमोरील आव्हानांवर काम करण्यासाठी वेळ खर्च करणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. ते म्हणाले तसं, अजितदादा किंवा माझ्या घरी धाड पडलेली नाही. त्यामुळे त्यांच्या भाषणातील बऱ्याचश्या गोष्टी या तथ्यहीन होत्या. पण, करमणुकीत थोडा मसाला, थोडी अतिशयोक्ती असतेच. त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे मनोरंजन म्हणून बघा, फारश्या गांभीर्याने घेऊ नका, अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली आहे.

























































